ट्युशनटिचरने प्रियकरासह विद्यार्थ्याची केली हत्या, पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी रचले नाटक

कानपूरमध्ये एका व्यापाऱ्याच्या मुलाच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. दहावीत शिकत असलेला कुशाग्र सोमवारी संध्याकाळी स्कूटी घेऊन ट्यूशनसाठी घरातून निघाला तो घरी परतलाच नाही. घरचे चिंतेत असतानाच रात्री मुलाच्या घरी 30 लाख रुपयांची मागणी करणारी एक चिठ्ठी फेकून आरोपी फरार झाले आणि घरच्यांना धक्का बसला. अपहरण झाल्याचे लक्षात येतात कुशाग्रच्या पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र तपास केल्यानंतर मुलाचा मृतदेह सापडला मात्र हत्येचे कारण समजल्यावर  सर्वांनाच धक्का बसला.

पोलिसांच्या सुत्रांनुसार, कुशाग्र (16) चा मृतदेह त्याची ट्युशन टिचर रुचिता हिच्या घरातील स्टोररुममध्ये सापडला. रुचिताच्या प्रियकर प्रभातने त्याची गळा दाबून हत्या केली आहे. प्रभातला संशय होता की, कुशाग्र आणि रुचिताचे प्रेमसंबंध आहेत. या संशयामुळे प्रभातने कट रचून कुशाग्रची हत्या केली. त्याच्या या कटात रुचिता आणि प्रभातचा मित्र आर्यनेही त्याला साथ दिली. त्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी रुचिताने कट रचून अपहरण झाल्याचे दाखविण्यासाठी आर्यनची मदत घेतली. हत्येनंतर त्याची स्कूटीची नंबर प्लेट बदलली. त्यानंतर कुशाग्रच्या घरी 30 लाखांची मागणी करणारी चिठ्ठी फेकली आणि फरार झाले. कोणाला संशय येऊ नये म्हणून त्यात धार्मिक घोषणाही लिहीली होती. त्यामुळे पोलीस संभ्रमात पडले होते. या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटिव्ही तपासले असता प्रभातचे नाव समोर आले. त्यानंतर प्रभात आणि रुचिराची कसून चौकशी केली असता त्यांनी खरे सांगितले.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रभात रुचिता आणि कुशाग्र यांच्यात प्रेमसंबंध असल्याचा संशय असल्याने त्याने ही हत्या केली. सोमवारी संध्याकाळीच कुशाग्रची हत्या करण्यात आली होती मात्र पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी अपहरणाचे नाटक केले होते. सीसीटीव्ही तपासल्यावर कुशाग्र स्वतःच्या इच्छेने रचिताच्या घरी गेल्याचे दिसून आले. त्यानंतर रचिताचा प्रियकर प्रभात घरात प्रवेश करतो. त्याचे घर रचिताच्या घराजवळ आहे. नंतर दोघेही बाहेर येतात पण कुशाग्र बाहेर पडत नाही. त्यावेळी घरातच त्यांची हत्या झाली असण्याची शक्यता आहे. सध्या पोलिसांच्या अधिकृत वक्तव्याची प्रतीक्षा आहे.