ईडी खोटं बोलणारी मशीन; निवडणूक प्रचारापासून रोखण्याचा डाव असल्याचा ‘आप’चा आरोप

दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळय़ाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना नऊवेळा समन्स बजावले, परंतु त्यांनी सहकार्य केले नाही. केजरीवाल यांना ईडीच्या चौकशीपासून पळ काढायचा आहे, असा युक्तिवाद ईडीने आज सर्वोच्च न्यायालयात केला. यावर ईडी ही खोटं बोलणारी मशीन असून केजरीवाल यांना प्रचारापासून रोखण्यासाठीच ही चौकशी आहे. ही ईडीची नाही तर भाजपची चौकशी आहे, अशा शब्दांत आपने ईडीवर हल्ला चढवला.

केजरीवाल यांची अटक कायदेशीरच असल्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ईडीने केजरीवाल यांच्या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश ईडीला दिले होते. त्यानुसार ईडीने आज सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. केजरीवाल यांच्या विरोधात उपलब्ध असलेल्या पुराव्यांशी छेडछाड होण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ घोटाळय़ाच्या कालावधीत 36 व्यक्तींनी तब्बल 170 पह्न बदलले असा दावाही ईडीने सर्वोच्च न्यायालयासमोर केला. दरम्यान, केजरीवाल यांच्या याचिकेवर पुढील आठवडय़ात सुनावणी होणार आहे.

तुरुंगातच केजरीवाल यांच्या हत्येचा कट

तिहार तुरुंगातच केजरीवाल यांची हत्या घडवण्याचा कट आखण्यात आला आहे, असा आरोप आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन केला.

केजरीवाल आणि ‘आप’च्या इतर नेत्यांविरोधात दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळय़ाप्रकरणी कुठल्याही प्रकारचे पुरावे ईडीकडे नाहीत. केजरीवाल यांना केवळ लोकसभा निवडणूक प्रचारापासून रोखण्यासाठीच त्यांना अटक करण्यात आली. ही ईडी चौकशी नाही तर भाजपची चौकशी आहे, अशा शब्दांत ‘आप’ने मोदी सरकारचा खरा चेहरा सर्वोच्च न्यायालयासमोर मांडला.