होय मी शिव्या दिल्या, ऑडियो क्लिपही माझीच!

मिंधे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी एका पत्रकाराला अत्यंत घाणेरड्या पद्धतीने शिवीगाळ केली. या शिवीगाळीचा ऑडियो व्हायरल झाला असून त्यांनी ज्या पद्धतीची भाषा वापरली आहे, त्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जळगाव जिल्ह्यात एका चिमुरडीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या मुलीच्या पालकांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून संवाद साधला. मात्र त्यांनी या संवादादरम्यान हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याबाबत , चांगले वकील देण्याबाबत कोणतही आश्वासन दिलं नाही. यावर पत्रकार संदीप महाजन यांनी बोट ठेवत मुख्यमंत्री चमकोगिरी करत असल्याचे म्हटले होते. याचा राग आल्याने किशोर पाटील यांनी त्याला शिवीगाळ केली होती.

पाटील यांना या क्लिपबाबत विचारलं असता त्यांनी सांगितलं की ही ऑडियो क्लिप माझीच आहे आणि हे सांगताना मला अजिबात दु:ख होत नाही. मी जे शब्द वापरले आहेत ते मागे घेणार नाही. मीच शिव्या दिल्या आहेत.

गोंडगाव येथील 8 वर्षीय मुलगी 30 जुलै रोजी बेपत्ता झाली होती. गावातील स्वप्नील पाटील या तरुणाने तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केल्याचे 1 ऑगस्टला उघड झाले. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने 48 तासांच्या आता आरोपीच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर संतप्त नागरिकांनी आरोपीला ताब्यात देण्याची मागणी करत पोलिसांवरही दडकफेक केली. तसेच 4 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयावर विविध संघटना आणि सर्वपक्षियांकडून मूक मोर्चा काढण्यात आला. हे प्रकरणी फास्टट्रॅकवर चालवण्यात यावे आणि विधीतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी सरकारतर्फे नियुक्ती करावी अशी मागणी करण्यात आली.

दरम्यान, आमदार किशोर पाटील यांचे सुपुत्र सुमीत पाटील यांनी पीडित मुलीच्या आई-वडिलांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क करून दिला. पीडितेच्या पालकांनी हा खटला फास्टट्रॅकवर चालवावा अशी मागणी यावेळी केली. मात्र मुख्यमंत्र्यांनी मौन बाळगत पोलिसांशी बोलतो असे म्हणत त्यांची बोळवण केली. हा प्रकार निदर्शनास येताच पत्रकार संदीप महाजन यांनी ‘मुख्यमंत्र्यांची चमकोगिरी’ या आशयाखाली बातमी केली. यामुळे संतप्त झालेल्या मिंधे गटातील आमदार किशोर पाटील यांनी त्यांच्याशी संपर्क साधत शिवीगाळ केली. तसेच तू कुठे राहतो? तुझे हात-पाच तोडतो असे म्हणत धमकावले. या संभाषणाची ऑडियो क्लिप व्हायरल झाली असून किशोर पाटील यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.