पळालो नाही, मला पळवलं, आता सर्वांची नावे सांगणार; अटकेनंतर ड्रग माफिया ललित पाटीलचा गौप्यस्फोट

ससून रुग्णालयातून पसार झालेला ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा लपंडाव संपला आहे. मुंबई पोलिसांनी बंगळुरूजवळील चन्नासेंद्रम येथील एका हॉटेलमधून ललितला बेडय़ा ठोकल्या असून त्याला अंधेरी न्यायालयात हजर केले असता, सोमवार 23 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, वैद्यकीय तपासणीसाठी नेले जात असताना ललित पाटीलने माध्यमांकडे गौप्यस्फोट केला. ‘मी रुग्णालयातून पळालो नाही. मला पळवलं गेलं. यात कोणाकोणाचा हात आहे त्या सर्वांची नावे सांगणार आहे,’ असे तो म्हणाल्याने या संपूर्ण रॅकेटमध्ये राजकीय कनेक्शनचा संशय आणखी बळावला आहे.

ड्रग्जप्रकरणी ललित पाटील पुणे पोलिसांच्या कस्टडीत होता. आजारपणाच्या कारणाने तो 9 महिने ससून रुग्णालयात दाखल होता. तिथून 2 ऑक्टोबर रोजी तो पसार झाला होता. त्यानंतर ललित पाटीलला पसार होण्यासाठी नाशिकचा मंत्री आणि एका भाजप आमदाराने मदत केल्याचा सनसनाटी आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मंत्री दादा भुसे यांचा यामागे हात असल्याचे पुरावे असल्याचे सांगितले होते, तर काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनीही गंभीर आरोप केले होते. त्यामुळे राजकारण तापले असतानाच 16 दिवसांनी ललित पाटील मुंबई पोलिसांच्या कचाटय़ात सापडला असून, त्याच्या चौकशीतून या संपूर्ण ड्रग्ज रॅकेटचा आणि राजकीय कनेक्शनचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.

दहा दिवसांपासून पोलीस होते मागावर
पुणे पोलीस ललित पाटीलचा शोध घेत होते. तो नेपाळ सीमेवरून परदेशात पळाल्याचेही सांगण्यात येत होते. त्याचवेळी नाशिक ड्रग्ज प्रकरणात ललित पाटील हा मुख्य आरोपी असल्याने मुंबई पोलीसही ललितचा शोध घेत होते. गेल्या दहा दिवसांपासून पोलीस ललितच्या मागावर होते. या तपासाला यश आले असून ललित हा याप्रकरणी अटकेतील पंधरावा आरोपी आहे. नाशिकमधील शिंदे गावात धाड टाकून साकीनाका पोलिसांनी ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त केला होता. त्यात 300 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते.

75 ते 80 लोकांची विचारपूस

साकीनाका पोलीस ठाण्यात दाखल एका ड्रग्जच्या गुह्यात ललित मुख्य पाहिजे आरोपी होता. ललितजवळ मोबाईल नव्हता. त्यामुळे त्याला शोधायचे कसे, असे प्रश्नचिन्ह पोलिसांसमोर होते. ललितला ओळखणाऱया 75 ते 80 लोकांकडे चौकशी करण्यात आली. तेव्हा ललित सुरतला तीन दिवस थांबला होता, अशी माहिती हाती लागली. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक बाबी व खबऱयांच्या मदतीने शिताफीने शोध घेत ललितला बंगळुरूजवळ गाठले. दरम्यान, या गुह्यात ललितचा भाऊ भूषण पाटील हा सुद्धा प्रमुख आरोपी असून, मुंबई पोलीस एक-दोन दिवसांत त्याचा पुणे पोलिसांकडून ताबा घेणार आहेत.

दादा भुसे आणि शंभुराज देसाई यांची नार्को टेस्ट करा – सुषमा अंधारे

ललित पाटीलला पळवण्यात राजकीय नेते सहभागी आहेत, असे नमूद करताना ललित पाटील, ससूनचे डीन, त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर यांच्यासोबतच मंत्री दादा भुसे आणि शंभुराज देसाई यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. ललित पाटील प्रकरणाची चौकशी केंद्रीय तपास यंत्रणांकडून झाली पाहिजे. ससूनमधून पळून जाऊन ललित पाटील नाशिकमधे काही दिवस होता. मोठी रक्कम आणि दागिने घेऊन तो नाशिकमध्ये कसा राहिला याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना द्यावी लागेल, असे अंधारे म्हणाल्या.

ड्रग्ज रॅकेटचा मास्टरमाईंड कोण? – पटोले

महाराष्ट्र एक सुसंस्कृत आणि प्रगत राज्य असून महाराष्ट्राच्या नावलौकिकाला काळिमा फासण्याचे काम भाजप सरकार करत आहे. राज्यात मागील काही दिवसांत ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. एवढा मोठा ड्रग्जचा धंदा राजकीय आशीर्वाद असल्याशिवाय होऊच शकत नाही. ड्रगच्या काळय़ा धंद्यातील ललित पाटील हा एक प्यादे असून या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण? त्याचा शोध लागला पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ललितच्या अटकेनंतर केली.

ललितने नाशिकमधील महिलेकडून पंचवीस लाख नेले

एमडी ड्रग्ज काळ्या धंद्यातील घबाड ललित पाटील याने नाशिकमध्ये दडविल्याचे समोर आले आहे. पुण्यातून फरार झाल्यानंतर तो नाशिकमधील एका महिलेकडून पंचवीस लाख रुपये घेवून गेल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी दिली. दरम्यान, नाशिकमध्ये ललित आणखी कोणाला भेटला, कोणाकडे त्याने पैसे दडवून ठेवले असावेत, याचा शोध घेतला जात आहे.

पुणे ते बंगळुरू व्हाया सुरत

पुण्यातून सटकल्यांतर ललितने चाळीसगाव गाठले. चाळीसगावात काही दिवस मुक्काम केल्यानंतर तेथून तो धुळे आणि पुढे गुजरातमध्ये सुरत येथे गेला. सुरतमध्ये तीन दिवस थांबल्यावर तो सोलापूर, विजापूर असा मुक्काम हलवत बंगळुरूला गेला. बंगळुरूनजीकच्या चन्नासेंद्रम येथील एका हॉटेलात ललित थांबला असल्याची पक्की खबर मिळताच पोलिसांनी हॉटेलात धडक देऊन ललितच्या मुसक्या आवळल्या. या वेगवेगळय़ा ठिकाणी जाण्यासाठी ललितने रस्ते मार्गाचा वापर केला. रेंटवर कार घेऊन तो चाळीसगाव, धुळे, सुरत, सोलापूर, विजापूर आणि बंगळुरूला गेला, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. तो श्रीलंकेत पळून जाण्याच्या तयारीत होता असेही कळते.

लागेबांधे कुणाशी? तपासात उघड होणार

साकीनाका पोलिसांना त्यांच्याकडे दाखल एका ड्रग्जच्या गुह्यात ललित पाटील पाहिजे होता. त्यामुळे उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या अचूक मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक चिमटे तसेच निरीक्षक योगेश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मैत्रानंद खंदारे, उपनिरीक्षक पंकज परदेशी, राजेंद्र नागरे आदींची पथके तयार करून ललित पाटीलचा शोध सुरू केला होता. विविध ठिकाणी लपून बसल्यानंतर तो बंगळुरूनजीकच्या चन्नासेंद्रम येथील एका हॉटेलात आला असल्याची खबर मिळताच पोलीस पथकाने त्या हॉटेलात जाऊन शिताफीने त्याच्या मुसक्या आवळल्या. ललितला अटक करून अंधेरी न्यायालयात हजर केले असता त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ललित आताच आमच्या हाती लागला असून त्याची कसून चौकशी केली जाईल. त्याचे साथीदार कोण कोण आहेत, त्याचे कोणाशी लागेबंधे आहेत, ड्रग्ज आणि पैशाचा व्यवहार असा आहे याची संपूर्ण माहिती घेतली जाईल, असे मुंबईचे सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

 

फडणवीस म्हणतात, मोठं कनेक्शन बाहेर आणू

मुंबई पोलिसांना काही ड्रग्ज कारखान्यांची माहिती मिळाली आणि त्यांनी धाडी टाकल्या. काही गोष्टी मलाही कळल्या आहेत. त्या मी आताच सांगणार नाही. सगळी युनिटस् कामाला लागली आहेत. वेगवेगळय़ा ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. यातून एक मोठं कनेक्शन आम्ही बाहेर आणू, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ‘ड्रग्ज फ्री महाराष्ट्र बनवू’ असा दावाही त्यांनी केला.

पुणे पोलिसांकडून धोका4

ललितला अंधेरी न्यायालयात हजर करण्यात आले होते. ऍड. अमित मिश्रा त्याच्यातर्फे न्यायालयात हजर होते. त्यांनी ललितच्या जिवाला पुणे पोलिसांकडून धोका असल्याचे सांगितले. ललितवरील आरोप फेटाळत जामिनाची मागणी वकिलांनी केली. तेव्हा ड्रग्ज प्रकरणात आमचा तपास सुरू आहे. अटकेतील आरोपींनी ललितचे नाव घेतले आहे. आमच्याकडे सबळ पुरावे आहेत, असे नमूद करत पोलिसांनी कोठडी मागितली.

ललित कसा पळाला… पुणे पोलीस सांगतील!

‘मी पळालो नाही, मला पळवले गेले’ असे ललितने सांगितल्याने हे प्रकरण गंभीर बनले आहे. ललितच्या वक्तव्याबाबत सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांना विचारले असता त्यांनी थेट बोलणे टाळले. ललित पुण्यातून पळाला असल्याने पुणे पोलीस त्या प्रकरणाचा तपास करीत आहेत. त्यामुळे त्याबाबत आम्ही बोलू शकत नाही. त्याला आम्ही आमच्या गुह्यात अटक केली असल्याने आम्ही आमच्या प्रकरणाबाबत बोलू शकतो असे ते म्हणाले.

एन्काउंटर करू R!

ललितचा एन्काउंटर करू नका, अशी विनंती त्याच्या आईने हात जोडून केली. पोलिसांनी घराची झडती घेतली. ललित सापडला तर त्याचा एन्काउंटर करू म्हणाले. नेतेमंडळीही तेच सांगत आहे. त्यामुळे ललितला मारले जाईल अशी भीती आहे, असे त्याची आई म्हणाली. आमच्यावर आधीच मोठा आघात झाला आहे. आम्हाला आणखी त्रास होईल, असे काही करू नका. आमचे काही बरेवाईट झाल्यास नातवंडं पोरकी होतील, असे ललितचे आई-वडील म्हणाले.