कोल्हार-भगवतीपूर गांवावर बिबट्याची दहशद, सातच्या आत ग्रामस्थच होताहेत घरात बंदिस्त !

राहाता तालुक्यातील लोणी परिसरातील बिबट्याची दहशद अद्याप संपली नाही तोच कोल्हार-भगवतीपूर परिसरात बिबट्याने ग्रामस्थांना सातच्या आत घरात बंदिस्त केले आहे. कोल्हारचे माजी सरपंच ऍड सुरेंद्र खर्डे यांच्या लाकडी दरवाजा तोडीत बिबट्याने दोन शेळ्या फस्त केल्या. तर इतर अनेक ठीकानी मानवावर बिबटया झेप घेत असल्याने ग्रामस्थांनी धास्ती घेतली आहे.

लोणीमध्ये दोन मुलांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला त्यानंतर वन विभागाने आपली सर्व यंत्रणा उभी करून दोन बिबट्यांना जेरबंद करण्यात यश मिळविले. मात्र आता बिबट्यांनी कोल्हार-भगवतीपूर परिसरात मुक्काम ठोकल्याने प्रथमदर्शनी दिसत आहे. मानवी वस्तीत बिबट्यांचा संचार वाढत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. ऍड खर्डे यांच्या वस्तीवर बंदिस्त असणाऱ्या दोन शेळ्यांवर हल्ला झाला. रानशेंडा, पानसरे-सावंत वस्ती, कडस्कर वस्ती, तीन चारी, शिंदे वस्ती,राजुरी रोड, भगवतीपूर मधील शिंदे-खर्डे-पाटोळे वस्ती सह संपूर्ण कोल्हार-भगवतीपूर गांवात बिबट्याने अनेक हल्ले करीत पशुधन फस्त केले आहे.

भगवतीपूर मध्ये एक व्यक्तीवर चालत्या वाहनावर झेप घेत हल्ला केला होता. त्यामुळे येथे स्थिरावले बिबटे नरभक्षक तर नाहीत ना असा संशय निर्माण होत आहे. बिबट्यांच्या अधिवासाने रात्री 7 नंतर बाजारपेठेतही ग्राहक तुरळक प्रमाणात दिसत असल्याने व्यवसायिकांनाही बिबट्याच्या संचाराने फटका बसत आहे.

हॉटेल व्यवसायिक चिंतेत..!

रात्रीच नव्हे तर दिवसाही बिबट्यांनी कोल्हार-भगवतीपूर परिसरात उच्छाद मांडला आहे. त्यामुळे मुख्यत्वे सायंकाळ नंतर सुरू होणारा हॉटेल व्यवसाय संकटात सापडला आहे. हॉटेल भाडे, कामगार पगार व मेंटन्सन्स सुद्धा त्यांना परवडत नाही. त्यामुळे हॉटेल व्यवसायिक संकटात सापडला आहे.

जीवावर आले ते..कोंबडीवर निभावले..!

भगवतीपूर येथे एका वस्तीवर भरदिवसा मुलगा खेळत होता तर सोबत कोंबड्या चरत होत्या. यावेळी बिबट्याने अचानक मुलावर झेप घेणार तोच कोंबडी समोर आली. बिबट्याने मग कोंबडीच फस्त केली. मात्र चिमुकल्याचा जीव वाचल्याने जीवावर बेतले ते कोंबडीवर निभावले असेच म्हणावे लागेल.

वनखात्याने आता कोल्हार-भगवतीपूर परिसरावर लक्ष केंद्रित करावे

कोल्हार-भगवतीपूर परिसरात बिबट्याने उच्छाद मांडला आहे. अनेकांचे पशुधन फस्त करीत आहे. चालत्या वाहनावर माणसांवर हल्ले होत आहेत. तर चिमुकल्यांवर सुद्धा हल्ला होऊ शकतो. यापार्श्वभूमीवर वन विभागाने तातडीने पिंजरे उपलब्ध करीत या परिसरात लावून बिबट्यांना जेरबंद करावे अशी मागणी नागरिक करीत आहेत.