कमळाबाईचं बाहेरच्यांवर प्रेम, भाजपात गृहकलह; फडणवीसांच्या बंगल्याबाहेर नाराजांचा जन‘सागर’

लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून भारतीय जनता पक्षात गृहकलह निर्माण झाला आहे. तिकीटवाटपात बाहेरून आलेल्या उपऱयांवर कमळाबाईचे प्रेम ऊतू जात असल्याने भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते नाराज आणि संतप्त झाले आहेत. या नाराजांचा जनसागर आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर लोटला होता. प्रत्येकाची समजूत काढताना फडणवीस यांच्याही नाकीनऊ आल्याचे दिसत आहे.

माढा, नगर, सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीचा तिढा सुटलेला नाही. त्यात आज रत्नागिरी, परभणीचीही भर पडली आहे. या मतदारसंघांमध्ये भाजपाच्या मूळ कार्यकर्त्यांना डावलून उपऱयांना पुन्हा उमेदवारी दिली गेल्याने नाराजी पसरली आहे. या नाराजांची आज फडणवीसांच्या बंगल्यावर गर्दी झाली होती.

राधाकृष्ण विखे-पाटील, शिवेंद्रराजे भोसले, राम सातपुते आज फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचले होते. भाजपाने माढा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर तर नगरमधून खासदार सुजय विखे-पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिल्याने इतरांकडून जाहीर नाराजी व्यक्त होत आहे. नगरमध्ये लोकसभेसाठी राम शिंदे हे इच्छुक होते. परंतु तिथे विखे-पाटील यांना दुसऱयांदा संधी दिली गेल्याने ते नाराज झाले आहेत तर रणजितसिंह नाईक-निंबाळकरांच्या उमेदवारीला रामराजे नाईक-निंबाळकरांकडून जाहीर विरोध केला जात आहे. देशात 547 मतदारसंघ आहेत, माढय़ातच भाजपचे काय अडले आहे, आपल्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीत काही चुकीचा निर्णय घेतला तर जबाबदार कोण, असे वक्तव्य एका कार्यक्रमात करून रामराजे यांनी आपला विरोध स्पष्ट केला आहे.

सातारा मतदारसंघातील उमेदवारीवरूनही भाजपात वाद आहेत. उदयनराजे भोसले यांनी उमेदवारीसाठी मंगळवारी रात्री उशिरा फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज त्यांचे प्रतिस्पर्धी शिवेंद्रराजे फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचले.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील पदाधिकारीही आज ‘सागर’ बंगल्यावर गेले होते. रत्नागिरी-सिंधुदुर्गात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाच भाजपाकडून संधी मिळावी यासाठी प्रमोद जठार आणि राजन तेली हे फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचले होते. दुसरीकडे त्याच मतदारसंघातून मिंधे गटाच्या वतीने निवडणूक लढवण्यास विद्यमान मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण हे उतावीळ आहेत.

जळगाव, रावेर, धुळय़ामध्येही नाराजीची लाट

जळगाव, धुळे आणि रावेरमध्येही भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची लाट पसरली आहे. या मतदारसंघांमध्ये दिलेले उमेदवार बदलावेत या मागणीसाठी शेकडो कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे भाजपासमोर वेगळाच पेच निर्माण झाला आहे.

जळगाव मतदारसंघात तगडे दावेदार असलेले उन्मेष पाटील यांना भाजपाने डावलून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे. त्यावरून उन्मेष पाटील नाराज आहेत. पाटील यांना उमेदवारी न मिळाल्यास भाजपा उमेदवाराला मतदान करणार नाही, असा इशारा पाटील यांच्या समर्थकांनी दिला आहे.

जळगावच्या रावेरमधून भाजपने रक्षा खडसे यांना सलग तिसऱयांदा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. रक्षा खडसे या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले एकनाथ खडसे यांच्या सूनबाई असल्याने त्यांना पक्षाने उमेदवारी द्यायला नको होती, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

धुळे मतदारसंघात भाजपाने माजी केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यांना उमेदवारी दिल्यामुळेही पक्षांतर्गत नाराजी निर्माण झाली आहे.

कोण कोण रुसलंय?

रणजितसिंह नाईक यांच्या उमेदवारीला रामराजे नाईक यांचा विरोध.

उदयनराजे यांचे प्रतिस्पर्धी शिवेंद्रराजे फडणवीसांच्या भेटीला पोहोचले.

सोलापुरातून उमेदवारीसाठी राम सातपुते इच्छुक पण प्रतिसाद नाही.