कॉन्ट्रॅक्टर मित्र जोमात आणि शेतकरी कोमात; उद्धव ठाकरे यांची अर्थसंकल्पावरून राज्य सरकारवर टीका

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडला. ‘महायुती सरकारचा हा अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे कॉन्ट्रॅक्टर मित्र जोमात आणि शेतकरी कोमात’, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. विधानभवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पातील त्रुटींवरून राज्य सरकारवर निशाणा साधला.

”हा अर्थसंकल्प निवडणूका डोळ्यासमोर ठेवून मांडलेला आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील काही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका पडला. आता एकूणच महाराष्ट्राला या अवकाळी घोषणांचा फटका पडेल की काय अशी भीती वाटते आहे. विकासाच्या नावाखाली लाखो करोडो रुपयांच्या योजनांची घोषणा झालीय. पण प्रत्यक्षात आक्रोश करणाऱ्या शेतकऱ्याच्या पदरात काहीही पडलेले नाही. सरकारचा कारभार पाहिला तर मुंबईत रस्ते घोटाळा झालाय. टेंडर वर टेंडर हे लोकं काढत आहेत. मग घोटाळा बाहेर येतो. प्रत्यक्षात काहीही काम होत नाही. महायुती सरकारचा अंतरिम संकल्प म्हणजे कॉन्ट्रॅक्टर मित्र जोमात आणि शेतकरी कोमात असा हा अर्थसंकल्प आहे. अंगनवाडी सेविका आशा वर्कर संपावर आहेत. त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले जात नाहीए. शासकीय रुग्णालयात डॉक्टरांविना उपचाराविना, औषधांविना मृत्यू झाले आहेत. त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही. पण नवीन हॉस्पिटलच्या घोषणा झाल्या आहेत. पहिल्या घोषणांचा पाठपुरावा कुठेही दिसत नाही. मृगजळाचा पाठलाग करायला लावायचा. असं या सरकारचं धोरण दिसतंय”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

”या अर्थसंकल्पात मराठी भाषेबद्दल काहीही बोलले गेलेले नाही. शिवरायांच्या गडकिल्ल्यांबाबत आमच्याच धोरणांचा त्यांनी पुन्हा उल्लेख केलाय. माननीय पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते समुद्रातील शिवस्मारकाचं जलपूजन झालं होतं ते कधी पूर्ण होणार यांची गँरंटी कुणी घेत नाहीए. त्याबद्दल अवाक्षरही काढलं नाही. पुढचं पाठ आणि मागचं सपाट असा अर्थसंकल्प आहे हा, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

आताच्या महासंचालिकांकडून फडणवीसांनी आमच्या फोनचे रेकॉर्ड मागवावे

1 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील आंदोलनाला बसलेले असताना त्यांच्या आंदोलकांवर त्याच संध्याकाळी निर्घृणपणे लाठीचार्ज करण्यात आला. अतिरेकी घुसले तसं वागवलं गेलं होतं मराठा आंदोलकांना. आता हे आमच्यावर आरोप करत आहे. मग शोधून काढा आमच्याकडून कुणी त्यांना किती फोन केले. आताच्या ज्या महासंचालिका आहेत त्यांच्याकडे आमच्या फोनचा रेकॉर्ड असेलच तो फडणवीसांनी घ्यावा, असा टोला उद्ध व ठाकरे यांनी लगावला.

जरांगे पाटलांनाही अतिरेकी ठरवणार का?

”उत्तरेतल्या शेतकऱ्यांना अतिरेकी ठरवण्यापर्यंत यांची मजल गेलेली. तशीच जरांगे पाटलांना देखील अतिरेकी ठरवणार काय? कुणी आपल्या न्याय हक्कासाठी लढायचंच नाही का? एखाद्याची मागणी चूक असेल किंवा ती पूर्ण करणं शक्य नसेल तर त्याला विश्वासात घेणं हे राज्यकर्तयांचं काम असतं. त्याला गुन्हेगार ठरवणं हे राज्यकर्त्यांचं काम नसतं, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

आंदोलनाची चौकशी चिवटपणे करा

”मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांवर जे आरोप केले आहेत. त्या आरोपांची देखील एसआयटी चौकशी व्हायला हवी. पण मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याच्या मागे लागायचे तर सरकार त्यांच्याच मागे लागतंयत. त्यांच्या आरोपांच्या मागे आम्ही आहोत असं म्हणता. मग एक दीड महिन्यापूर्वी त्यांच्यासोबत गुलाल कुणी उधळला होता. कुणी फटाके फोडले. मला एकच सांगायचं आहे की आता आंदोलनाची एसआयटी चौकशी करताय मग ती चिवटपणाने करा, मध्ये सोडू नका’, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मराठी भाषा

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा असा प्रस्ताव केंद्राकडे आलेला नाही असे समोर आले आहे. त्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की यासारखे दुर्दैव असू शकत नाही. आमचे सरकार असताना आम्ही देखील प्रस्ताव पाठवले होते. फडणवीसांचे सरकार असताना त्यांनी देखील हा प्रस्ताव पाठवला याची आम्हाला खात्री वाटतेय. मग त्यांनी त्या प्रस्तावाचे पुढे काय झाले ते काही नाही बघितले, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.