दुष्काळाने शेतकरी त्रस्त, मिंधे फाइव्हस्टारमध्ये मस्त

राज्य मंत्रिमंडळाचा दरबार उद्या मराठवाडय़ात भरणार आहे. एका दिवसाच्या बैठकीसाठी मिंधे सरकारकडून कोटय़वधी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. बैठकीसाठी जाणाऱया मंत्र्यांच्या राहण्याखाण्यासाठी पंचतारांकित व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळ दोन दिवस छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणार आहे. दुष्काळामुळे मराठवाडय़ातील शेतकऱयाची अन्नान्न दशा झाली आहे, पण मंत्रिमंडळ व अधिकाऱयांच्या जेवणासाठी एका थाळीची किंमत दीड हजार रुपये असणार आहे. या उधळपट्टीवरून चौफेर टीका होत आहे.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त स्मार्ट सिटीच्या आलिशान कार्यालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात येणार आहे. 2016 नंतर सात वर्षांनी ही बैठक मराठवाडय़ात होत आहे. या बैठकीसाठी मिंधे सरकारचे 30 मंत्री, 100 सचिव तसेच 400 अधिकारी शहरात शुक्रवारी डेरेदाखल दाखल झाले. तत्पूर्वी बैठकीसाठी लागणारे दस्तावेज पुढे पाठवण्यात आले. त्यात हजारो फायलींचा समावेश आहे.  स्मार्ट सिटीच्या आलिशान कार्यालयाच्या सभागृहात मंत्रिमंडळाचा दरबार भरणार आहे. दुपारी 12 वाजता मंत्रिमंडळ बैठकीला प्रारंभ होणार असून ती तीन तास चालणार आहे.

राजा तुपाशी, शेतकरी उपाशी -वडेट्टीवार

 राजा खातोय तुपाशी…शेतकरी मात्र उपाशी असे ट्वीट  विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या उधळपट्टीवरून केले आहे. दुष्काळग्रस्त भागासाठी पॅबिनेट बैठक आहे की महायुतीच्या मंत्र्यांचे पर्यटन? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. फडणवीस सरकारने 2016 ला दिलेले पॅकेज मराठवाडय़ातील जनता विसरली नाही. 50 हजार कोटीच्या पॅकेजचं काय झालं? असा सवाल करतानाच, मराठवाडय़ातील जनता अशा नालायक सरकारला माफ करणार नाही, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला.

येडय़ांच्या सरकारकडून जनतेच्या पैशांवर मौजमजा! – नाना पटोले

राज्यातील येडय़ाच्या (ईडीए) सरकारकडून जनतेच्या पैशांवर पंचतारांकीत मौजमजा करण्याचा हा प्रकार आहे.  हे गेंडय़ाच्या कातडीचे सरकार आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

शरम वाटली पाहिजे – इम्तियाज जलिल

 शरम वाटली पाहिजे सरकारला, अशी प्रतिक्रिया एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी दिली. 2016 मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाडय़ाला जे पॅकेज देण्यात आले होते त्या सर्व योजना पूर्ण करा, अशी मागणीही जलिल यांनी केली आहे.

कोणाच्या पैशाने उधळपट्टी? – अंबादास दानवे

छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱया मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी जी उधळपट्टी सुरू आहे ती कोणाच्या पैशाने सुरू आहे, असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. शासनाच्या प्रत्येक विभागाला शासकीय वाहने आहेत. ती असताना मंत्र्यांसाठी वेगळ्या 150 गाडय़ांची गरज काय होती, असे दानवे यांनी म्हटले आहे. मंत्र्यांसाठी बुक केलेल्या हॉटेलच्या रूमचे भाडे 33 हजार रुपये आहे. कलेक्टरने 15-15 दिवस आधीच संभाजीनगरातील फाईव्ह स्टार हॉटेल बुक केली आहेत, असेही दानवे यांनी सांगितले.

दिमतीला 300 खासगी गाडय़ा

बैठकीसाठी छत्रपती संभाजीनगरमधील पंचतारांकीत हॉटेलांमधील बहुतांश रुम बुक करण्यात आले आहेत. एक दिवसाची बैठक, दोन दिवसांचा मुक्काम असताना पंधरा दिवसांपासून हे रुम बुक करून ठेवले आहेत. मंत्री व अधिकाऱयांसाठी शासकीय वाहने असतानाही सुमारे 300 खासगी वाहने भाडय़ाने घेतली गेली आहेत.

  • मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री – फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये 30 रूम बुक
  • सर्व सचिव – ताज हॉटेलमध्ये 40 रूम
  • उपसचिव, खासगी सचिव, कक्ष अधिकारी – अमरप्रीत हॉटेलमध्ये 70,
    अजंता अॅम्बेसेडर हॉटेलमध्ये 40 रूम
  • सुरक्षा रक्षक, वाहनचालक – महसूल प्रबोधिनीत 100 तर पाटीदार भवनमध्ये 100 रूम, इतर अधिकारी – वाल्मी, सिंचन, महावितरण, सुभेदारी विश्रामगृह – 20 रुम
  • नम्रता कॅटरर्सला जेवणाचे कंत्राट, थाळीचा दर एक हजार ते दीड हजार रुपये
  • मंत्र्यांसाठी खास काजू, बदाम, पिस्ते, किसमिस, मनुका व सँडविच