अजित पवारांना अर्थखाते मिळण्याची शक्यता; देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मिंधे गटासह भाजपमध्येही असंतोष?

ajit-pawar-shinde-fadnavis

अजित पवार अर्थ मंत्रालय मिळणार असल्याच्या वृत्तानं महाराष्ट्रातील भाजप-शिंदेगट-अजित पवार गटाच्या युतीमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात भाजप आणि मिंधे गटात असंतोष निर्माण झाल्याचं वृत्त आहे. इंग्रजी संकेतस्थळांनी यासंदर्भात सूत्रांच्या आधारानं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीदरम्यान आपल्या पक्षाच्या मंत्र्यांसाठी महत्त्वाच्या खात्यांसाठी लॉबिंग करणाऱ्या अजित पवारांसाठी अर्थ मंत्रालय झाले तर तो अजित पवारांचा मोठा विजय असेल असे बोलले जात आहे. अजित पवारांवर आरोप करतच मिंधे गट बाहेर महायुतीतून बाहेर आला होता. आता तेच अजित पवार सत्तेत आले आहेत आणि आता अर्थ मंत्रालय त्यांना मिळाल्यास जनतेला कोणत्या तोंडानं सामोरे जाणार आणि निधी वाटपाचाचं घोडं अडणार अशी भिती सर्वांना वाटत आहे.

आपल्या युतीतील नव्या भागीदारामुळे मिंधे गटाची गोची झाली आहे. मंत्रिपदाच्या आशेवर बसलेल्या भाजप आणि मिंधे गटाच्या आमदारांमध्ये नाराजी पसरली आहे. भाजपच्या ‘पार्टी विथ डिफ्रेन्स’ प्रतिमेचं नुकसान झाल्याची भिती भाजप आमदारांना वाटत आहे. तर मिंधे गट कात्रितच सापडल्या सारखा झाला आहे, असं बोललं जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्ताराच्या विलंबाचे कारण अजित पवार यांच्या गटात आणि मिंधे गटातील अर्थ आणि नियोजन खात्यांवरून निर्माण झालेल्या वादाला कारणीभूत आहे. राष्ट्रवादीला अर्थ आणि सहकार मंत्रिपद मिळावे यासाठी अजित पवार ठाम आहेत, मात्र मिंधे गटाची याबाबत नाराजी असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी अजित पवार दिल्लीत गेले होते. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांचं विधान समोर आलं आहे. ते म्हणाले, ‘उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी भाजप नेतृत्वाची भेट न घेतल्याने आम्ही शिष्टाचारासाठी येथे आलो आहोत’.

खाते वाटपावरून भाजप-मिंधे गट- अजित पवार गट यांच्या युतीमध्ये वाढत्या मतभेदाच्या बातम्यांना पटेल यांनी फेटाळून लावलं.

‘महाराष्ट्रात खाते वाटप उद्या किंवा परवा होईल. मंत्रिमंडळ विस्तारावर दुमत नाही. त्याबाबत सविस्तर चर्चा झाली आहे. आम्ही 18 जुलैला पंतप्रधान मोदींना भेटणार आहोत. आम्हाला एनडीएच्या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं आहे’, असं त्यांनी पत्रकारांशी बोलताना बुधवारी सांगितलं.