राज्यात सत्तेचा गैरवापर सुरू, घडलेल्या घटनांमधून सत्ताधाऱ्यांनी योग्य तो धडा घ्यावा; शरद पवार यांनी सुनावले

सरणारे 2022 हे वर्ष आणि आगामी वर्षाबाबत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आपली मते व्यक्त केली आहेत. तसेच त्यांनी राज्यातील राजकीय घटनांवरून सत्ताधाऱ्यांना समज देत, या घटनांवरून सत्ताधाऱ्यांनी योग्य तो धडा घ्यावा, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे. 2022 या वर्षाचा शेवटचा दिवस आहे. तसेच नव्यावर्षाच्या स्वागतासाठी अध्यक्ष शरद पवार हे बारामती येथे आले आहेत. यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्यात सत्तेचा गैरवापर होत असल्याचे सांगत सरकारवर तोफ डागली.

अनिल देशमुख यांच्या सुटकेवर बोलताना ते म्हणाले की, सत्तेचा गैरवापर होतोय, हे आम्ही सातत्याने सांगतोय. अनिल देशमुख, संजय राऊत यांच्याबाबत हे दिसून आले आहे. ज्या लोकांना आत टाकलं, त्यांच्याबद्दल काही आढळलं नाही, हे न्यायदेवतेने देखील सांगितले आहे. सत्तेचा गैरवापर करुन लोकप्रतिनिधींना डांबून ठेवण्याचे काम मागचे सहा महिने – वर्षभरात झाले. याच्यामधून सरकारचा दृष्टीकोन चुकीचा आहे, हे कोर्टाच्या माध्यमातून संबंध देशाच्या समोर आले आहे. सरकारने याच्यातून काहीतरी शिकावे, एवढीच अपेक्षा आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

शरद पवार यांनी संसदेचे अधिवेशन ज्याप्रकारे झाले, त्यावर नाराजी व्यक्त केली. संसदेच्या अधिवेशनात काहीही होऊ शकत नाही. विरोधकांना बोलू द्यायचं नाही, अशी सत्ताधारी पक्षाची भूमिका आहे. सभागृहात गोंधळ घालायचा आणि त्यांना हव्या त्या बाबी मंजूर करुन घ्यायच्या. दुर्दैवाने हे चित्र किती दिवस चालू द्यायचे याचा विचार विरोधकांनाही करावा लागेल. जानेवारी महिन्यात नव्या अधिवेशनाची सुरुवात होईल, फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. सत्ताधारी पक्षाने राष्ट्राचा विचार करत संसदेचा दर्जा राखण्याची भूमिका घेऊन पावले टाकली पाहीजेत. विरोधक म्हणून आम्ही सहकार्य करु, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरणारे वर्ष शेतीसाठी चांगले होते, असेही पवार म्हणाले. संबंध वर्षाचा आढावा घेतला तर 2022 मध्ये काही चांगल्या गोष्टी घडल्या आहेत. अनेक प्रश्न सोडविण्यासाठी सामान्य जनतेने प्रयत्न केले. आता आपल्या सर्वांसमोर 2023 चे नवे प्रश्न उभे राहणार आहेत. नव्या वर्षाकडे संपूर्ण देश औत्सुक्याने बघत आहे. देशातील 56 ते 60 टक्के लोक शेतीच्या व्यवसायात आहेत. सरत्या वर्षात चांगले पर्जन्यमान झाले. शेती संपन्न झाली तर बहुसंख्य लोकांची क्रयशक्ती वाढते. बळीराजा यशस्वी झाला तर देशातील अन्य घटाकांचे देखील दिवस चांगले येतात. व्यापार आणि उद्योगांची भरभराट होते, असेही त्यांनी सांगितले.