Pune Porsche Case: बिल्डरच्या अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द, 14 दिवसांसाठी बालसुधारगृहात रवानगी

बेदरकारपणे आलिशान मोटार चालवून दोन जणांचा जीव घेणाऱ्या मद्यधुंद अल्पवयीन मुलाचा जामीन बाल हक्क मंडळाने रद्द केला आहे. त्याची आता 14 दिवसांसाठी बालसुधारगृहात रवानगी केली आहे. अपघात घडल्यानंतर पोलिसांनी त्याला बाल हक्क मंडळासमोर हजर केले होते. मात्र, मंडळाने अवघ्या काही तासात अल्पवयीनाला जामीन मंजूर केला होता. मंडळांच्या निर्णयावर आणि पुणे पोलिसांवर सर्व स्तरावर चौफेर टीका झाली होती. त्यामुळे पुणे पोलिसांनी याप्रकरणी बाल हक्क मंडळाला अर्ज केला होता. त्याची सुनावणी बुधवारी बाल हक्क मंडळाने केली आहे. त्यानुसार अल्पवयीन मुलाला आता बालसुधारगृहात पाठवले जाणार आहे.

कल्यानीनगर परिसरात आलिशान मोटार चालवून अल्पवयीन मुलाने दोघाना चिरडल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली होती. त्यांनतर पोलिसांनी संबंधित मुलाला ताब्यात घेऊन, बाल हक्क मंडळापुढे हजर केले होते. मुलाचे वय 17 वर्षे 8 महिने असल्याने त्याने वाहतूक नियमावर निबंध लिहावा, वाहतूक नियमन करण्यासाठी पोलिसांसोबत काम करावे, मद्यपान सोडून देण्यासाठी प्राधान्य द्यावे, असे नमूद करीत त्याला जामीन मंजूर केला होता. अवघ्या 12 ते 15 तासात जामीन मंजूर झाल्यामुळे संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. त्यासोबतच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पत्रकार परिषदेत बाल हक्क मंडळाच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले होते. दरम्यान याबाबत पुणे पोलिसांनी बाल हक्क मंडळाकडे पुनर्विचार करण्याचा अर्ज दाखल केला होता. त्याची सुनावणी बुधवारी रात्री करण्यात आली. त्यानुसार आता संबंधित अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द करण्यात आला असून त्याची रवानगी बाल सुधार गृहात करण्यात आली आहे.

मेडिकलनंतर ठरणार मुलगा सज्ञान की अल्पवयीन

अपघात प्रकरणात पुणे पोलिसांकडून तपास केला जात आहे. अल्पवयीन मुलगा आहे की नाही हे ठरविण्याचा अधिकार पोलिसांचा नाही. तो अल्पवयीन सज्ञान आहे की नाही हे मेडिकल केल्यानंतर ठरविण्यात येणार आहे.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले होते आश्चर्य

अपघातानंतर अल्पवयीन मुलाला बाल हक्क मंडळापुढे हजर करण्यात आले होते. मात्र, अवघ्या काही तासातच त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांसह राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्चर्य व्यक्त केले होते. त्यासोबतच पोलिसांनी याबाबत पुनर्विचार करण्याचा अर्ज बाल हक्क मंडळापुढे सादर केला होता. त्यानुसार आज मंडळांनी निर्णय दिला आहे. त्याच अनुषंगाने मुलाची बाल सुधार गृहात रवानगी केली आहे.