माझे जोडे मोजण्यापेक्षा कोळसा घोटाळा करणाऱ्या अदानींवर एफआयआर दाखल करा

नीतिमत्ता समितीने आपल्याला विचारलेले प्रश्न अत्यंत खालच्या दर्जाचे आणि असभ्य आहेत. त्याच्या नोंदी माझ्याकडे आहेत. समितीचे अध्यक्ष अत्यंत हास्यास्पद आणि निर्लज्ज असून त्यांनी माझे जोडे मोजण्यापेक्षा अदानींवर कोळसा घोटाळय़ाप्रकरणी एफआयआर दाखल करावा, अशा शब्दांत खासदार महुआ मोईत्रा या आज ‘एक्स’वरून पुन्हा शिस्तपालन समितीवर कडाडल्या.

संसदेत पॅश फॉर क्वेरी प्रकरणात अडकलेल्या मोईत्रा यांनी आज पुन्हा एकदा ‘एक्स’वरून नीतिमत्ता समितीवर निशाणा साधला. सीबीआय आणि ईडीने तब्बल 13 हजार कोटी रुपयांच्या कोळसा घोटाळय़ाप्रकरणी अदानींविरुद्ध एफआयआर करावा, अशी मागणी मोईत्रा यांनी केली आहे.

2 नोव्हेंबरला नेमके काय घडले?

मोईत्रा यांना 2 नोव्हेंबर रोजी नीतिमत्ता समितीसमोर हजर व्हायचे होते. त्यानुसार महुआ मोईत्रा 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजून 50 मिनिटांनी संसदेच्या नीतिमत्ता समितीच्या कार्यालयात पोहोचल्या; परंतु समितीने आपल्याला अत्यंत घृणास्पद आणि आक्षेपार्ह प्रश्न विचारल्याचा आरोप करत प्रचंड त्रागा करतच समितीच्या कार्यालयातून त्या बाहेर पडल्या. त्यानंतर महुआंनी सभापती विनोद सोनकर यांचे वर्तन अत्यंत अनैतिक, घृणास्पद आणि पूर्वग्रहाने भरलेले असल्याचा आरोप करणारे पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिले.