मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार, गोळीबारात चार जणांचा मृत्यू

मणिपुरमध्ये नव्या वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला आहे. सोमवारी सायंकाळी थौबल जिल्ह्यात 4 लोकांची गोळी मारुन हत्या केली तर अन्य पाचजण जखमी झाले आहेत. त्यामुळे परिस्थिती पाहता पाच जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लिलाँगच्या स्थानिक रहिवाशांनीही गोळीबाराची पुष्टी केली आणि जमिनीवर पडलेल्या मृत बळींची छायाचित्रे शेअर केली.

पीटीआयच्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की, हल्लेखोरांची अद्याप ओळख पटलेली नाही. हल्लेखोरांनी लिलॉंग चिंगजाओ भागात घूसून स्थानिक लोकांना लक्ष्य करत गोळीबार केला, ज्यात 4 जण जागीच ठार झाले. तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या हल्ल्यानंतर संतप्त जमावाने तीन गाड्या पेटवून दिल्या. त्या गाड्या कोणाच्या आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या हिंसाचारानंतर थौबल, इंफाळ पूर्व, इंफाळ पश्चिम, कक्चिंग आणि बिष्णुपूर जिल्ह्यात पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

यावर आता मणिपुरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी व्हिडीओच्या माध्यमातून या हिंसाचाराचा निषेध केला आहे. तसेच लिलाँगमधील रहिवाशांना शांतता राखण्याचे आवाहन केले. गुन्हेगारांना पकडण्याचे काम पोलीस करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याला लवकरच अटक करून कायद्यानुसार शिक्षा केली जाईल असे सांगितले.