मराठा वादळ मुंबईच्या दिशेने; सरकारच्या दारात मरण आले तरी बेहत्तर, पण आता मागे फिरणार नाही!

सात महिने झाले, मराठा आरक्षणाच्या नावावर सरकारदरबारी खेळ चालू आहे. वेळ मागितला वेळ दिला. पण सरकारने काही केले नाही. सरकारचा इरादा नेक नाही. त्यामुळे आता शासनाच्या दारात मरण आले तरी बेहत्तर, पण मागे फिरणार नाही. मराठा आरक्षण घेऊनच मुंबईतून परतणार असा निर्धार व्यक्त करीत मनोज जरांगे यांनी लाखो मराठा आंदोलकांसह शनिवारी मुंबईकडे कूच केले.

छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून आंतरवाली सराटी येथून आज मराठा आंदोलकांचा काफिला सकाळी 10 वाजता मुंबईकडे मार्गस्थ झाला. यावेळी पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे यांनी सरकारच्या विश्वासार्हतेवर बोट ठेवले. 54 लाख कुणबी नोंदी मिळाल्याचे सरकार सांगते. मग प्रमाणपत्र वाटण्यापासून सरकारला कोणी रोखले आहे का? मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत 250 पेक्षा जास्त मराठा तरुणांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. सरकारदरबारी त्या जिवांची किंमत काहीच नाही का, असा संतप्त सवालही यावेळी जरांगे यांनी केला. सरकार मराठय़ांशी एवढे निर्दयीपणाने कसे वागू शकते, असे म्हणत असतानाच जरांगे यांना अश्रू अनावर झाले. जर सरकार असेच राजकीय सूडबुद्धीने वागणार असेल तर यांचा राजकीय सुपडा साफ करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

…अन् मनोज जरांगे भावुक झाले
आंतरवालीहून निघताना मनोज जरांगे हे अतिशय भावुक झाले. या गावाने मला जिवापाड प्रेम दिले. पण मराठा आरक्षणासाठी आता निकराचा लढा सुरू झाला आहे. मराठा समाजाने आता ही एकजूट अशीच ठेवावी. उपोषणामुळे शरीर आता मला साथ देत नाही, मी असेन नसेन पण हा लढा प्राणपणाने पुढे चालू ठेवावा, असे जरांगे म्हणाले. आंतरवालीहून निघेपर्यंत सरकारशी काहीही बोलणे झाले नाही आणि आता बोलण्यात काही अर्थ नाही. जो काही निर्णय घ्यायचा तो समाजाला विचारून आणि मुंबईत 26 जानेवारीला घेण्यात येईल, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.

आंतरवाली हेलावली
आंतरवाली हे जालना जिल्हय़ातील चिमुकले गाव. पण मनोज जरांगे यांच्या आंदोलनाने आंतरवाली जगाच्या नकाशावर चमकले. मनोज जरांगे हे गेवराई तालुक्यातील. पण सात महिन्यांपासून ते आंतरवालीचेच झाले. लाठीहल्ल्याच्या घटनेनंतर तर आंतरवालीकरांनी जरांगे यांना तळहातावरच्या फोडासारखे जपले. सकाळची दिनचर्या आटोपली की उपोषणस्थळी येऊन बसायचे. गावातील तरुणांबरोबर क्रिकेट खेळायचे. पत्रकारांशी मनसोक्त गप्पा मारायच्या. आज मनोज जरांगे मुंबईकडे निघाले. आंतरवालीतल्या घराघरातला माणूस त्यांना निरोप देण्यासाठी आला. मराठा आरक्षणासाठी ज्यांनी लाठय़ा खाल्ल्या त्या महिलांनी त्यांना औक्षण केले. जरांगे यांनी वेशीबाहेर पाऊल ठेवताच आंतरवाली हेलावली…

अंकुशनगरजवळ कुटुंबाची भेट
मराठा आंदोलकांचा काफिला अंकुशनगरजवळ येताच मनोज जरांगे यांची पत्नी सुमित्रा, मुलगी पल्लवी यांनी त्यांचे औक्षण केले. मुलगा शिवराज, मुलगी पल्लवी यांना पाहून जरांगे यांना गहिवरून आले. मुलांनाही वडिलांना पाहून अश्रू अनावर झाले. यावेळी बोलताना पल्लवी हिने मराठा समाजाच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात. माझ्या वडिलांच्या जिवाला काही झाले तर हे सरकार जागेवर राहणार नाही, असा इशाराही तिने दिला.

12 किमीसाठी तीन तास
आंतरवालीहून मराठा आंदोलक बाहेर पडले. शहागडपर्यंतचे 12 किमी अंतर पार करण्यासाठी या काफिल्याला तब्बल तीन तास लागले. आंतरवाली ते शहागड रस्त्यावरील गावागावातून लोक येत गेले आणि गेवराईला पोहचेपर्यंत ही संख्या लाखावर गेली. रस्त्यात ठिकठिकाणी मनोज जरांगे यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.