मिठी नदी रुंदीकरणातील 150 बेकायदा बांधकामांवर बुलडोझर

मिठी नदी रुंदीकरण प्रकल्पात अडथळा ठरणारी ‘एल’ कुर्ला विभागातील तब्बल 149 बेकायदा बांधकामांवर पालिकेने दोन दिवस धडक कारवाई करून बुलडोझर फिरवला. यामुळे तब्बल आठ हजार चौरस मीटर क्षेत्र अतिक्रमणमुक्त होणार झाले असून आता मिठी नदी रुंदीकरण प्रकल्पाला गती मिळणार आहे. शिवाय संरक्षक भिंतीच्या बांधकामालाही सुरुवात झाल्याने नदीकिनाऱयाजवळ असणाऱयावस्तीच्या सुरक्षेचाही प्रश्न मिटणार आहे.

उच्च न्यायालयाने निष्कासन कारवाईला परवानगी दिल्यानंतर ‘एल’ विभागाच्या वतीने सांताक्रूझ-चेंबूर रस्त्यालगत ही कारवाई करण्यात आली. प्रकल्पाच्या ठिकाणी सातत्याने होणारा स्थानिकांचा विरोध आणि प्रदीर्घ कायदेशीर लढा यानंतर विविध विभागांमध्ये चांगला समन्वय साधून ही निष्कासन कारवाई पार पडली. या कारवाईबद्दल पालिका आयुक्त -प्रशासक भूषण गगराणी यांनी उपआयुक्त देविदास क्षीरसागर, ‘एल’ विभागाचे सहाय्यक आयुक्त धनाजी हेर्लेकर आणि विधी विभाग यांच्या संयुक्त कामगिरीचे काwतुक केले आहे. तसेच पर्जन्य जलवाहिन्या आणि रस्ते विभागाने तातडीने प्रकल्पातील पुढील कार्यवाही सुरू करावी, अशा सूचनादेखील दिल्या आहेत. रस्ते विभागालाही लाल बहादूर शास्त्राr मार्ग ते मिठी नदी भागातील बॉक्स ड्रेनची कामे तातडीने करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, ज्या अधिकृत बांधकामांविरोधात निष्कासन कार्यवाही करण्यात आली आहे त्या ठिकाणी काही प्रमाणात अंतरिम भरपाई किंवा पर्यायी व्यवस्था आगामी चार आठवडय़ांत करण्यात येणार आहे.

संरक्षक भिंत बांधकामास सुरुवात

– अतिक्रमणे निष्कासित झाल्यानंतर मिठी नदी रुंदीकरण प्रकल्पअंतर्गत या ठिकाणी तातडीने संरक्षक भिंत बांधण्याच्या सूचना पर्जन्य जलवाहिन्या विभागाला देण्यात आल्या आहेत. या निष्कासन कार्यवाहीदरम्यान पर्जन्य जलवाहिन्या विभागाने तातडीने संयंत्रांचा पुरवठाही केला होता.

– त्यानुसार प्रकल्पस्थळी पर्जन्य जलवाहिन्या विभागाने तातडीने संरक्षण भिंत बांधण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. तसेच रुंदीकरण प्रकल्पात अडथळा ठरणारी उर्वरित बांधकामे ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आगामी काळात निष्कासित करण्यात येतील, असे सहाय्यक आयुक्त हेर्लेकर यांनी सांगितले.