मराठा आंदोलकांचा गनिमी कावा; कोंबडी चोर म्हणत नारायण राणेंना दाखवले काळे झेंडे

मराठा समाजाच्या आंदोलकांनी आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना गनिमी काव्याने दणका दिला. नगर दौऱ्यावर आलेल्या राणेंना मराठा आंदोलकांनी दोन ठिकाणी ‘कोंबडी चोर…कोंबडी चोर’ अशा घोषणा देत काळे झेंडे दाखवले.

नारायण राणे यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनावरून मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर नेहमीच टीका केली. त्यामुळे राणे यांच्याबद्दल मराठा समाजात संताप आहे. तो संताप आज नगरमध्ये दिसून आला. नगरच्या अकोळनेर येथे आत्मनिर्भर स्टील प्रोसिसिंग क्लस्टर सीएफसीच्या उद्घाटनासाठी राणे आले होते. नगर पोलीस मुख्यालयातील मैदानावर यासाठी हेलिपॅड तयार करण्यात आले होते. नारायण राणे तेथे उतल्यानंतर पुढे वाहनाने अकोळनेरकडे रवाना होणार होते. याचवेळी पोलीस मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर सकल मराठा समाजाचे आंदोलक उभे होते. त्यांच्या अंगावर काळे कपडे होते. काही जण काळे कपडे घेऊन आले होते. तोफखाना पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मंत्री राणे यांच्या वाहनांचा ताफा पुढे सरकताच आंदोलकांनी घोषणाबाजी केली.

पोलिसांनी सकल मराठा समाजाच्या आंदोलकांना ताब्यात घेतल्याचे समजताच पुढील मार्गावर दिल्ली दरवाजा येथे काही आंदोलक आक्रमक झाले. त्यांनी राणे यांच्या वाहनांचा ताफा येताच काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. या प्रकारामुळे पोलिसांची येथे चांगलीच धावपळ उडाली.

राणे यांच्या वाहनांचा ताफा पुढे सरकताच नगर-पुणे रोडवरील सक्कर चौकात उड्डाणपुलाजवळ मराठा आंदोलकांनी त्यांच्या वाहनांना काळे झेंडे दाखवण्यास सुरुवात केली. ‘काsंबडी चोर…’, ‘एक मराठा लाख मराठा…’, ‘राणे चले जाव…’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. काही मराठा आंदोलक हे वाहनांना आडवे होऊन काळे झेंडे दाखवत होते. वाहनाच्या ताफ्यामागे काळे झेंडे घेऊन पळत होते.