मराठा समाजाचे असहकार आंदोलन, छत्रपती संभाजीनगरात झालेल्या बैठकीत निर्णय

मराठा आरक्षणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणार्‍या राज्य सरकारसोबत असहकार करण्याचा निर्णय येथे झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी मराठा आरक्षण आंदोलनाच्या चौकशीसाठी एसआयटी नेमण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणीही करण्यात आली.

मराठा मंदिर कार्यालयात आज सकल मराठा समाजाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या भूमिकेबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. ओबीसीतून आरक्षण, सगेसोयर्‍यांच्या कायद्याची अंमलबजावणी, एसआयटी रद्द करणे आदी मागण्यांचा पुनरुच्चार यावेळी करण्यात आला. मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. या बैठकीला प्रा. चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे, प्रभाकर मते, विजय काकडे, सतीश वेताळ, मनोज गायके, सुनील कोटकर, रेखा वहाटुळे, सुकन्या भोसले, डॉ. दिव्या पाटील आदींची उपस्थिती होती.