मराठा समाज मोदींच्या विरोधात शड्डू ठोकणार; वाराणसी लोकसभा मतदारसंघातून एक हजार उमेदवार

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलकांनी आगामी लोकसभा निवडणुकीत आक्रमक भूमिका घेण्याचे धोरण आखले आहे. प्रत्येक गावातून दोन उमेदवार उभे करण्याच्या तयारीत मराठा समाज आहे. वाराणसी लोकसभा मतदारसंघातून एक हजार उमेदवार उभे करून पंतप्रधान मोदींनाच आव्हान देण्याची तयारी चालवली आहे.

लोकसभा निवडणुकीत मराठा समाज महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात प्रत्येक गावातून दोन उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहे. यासाठी बीड, नांदेड जिह्यात बैठका घेऊन तसे ठरावही करण्यात आले आहेत. परभणी शहरातील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात आज परभणीतील मराठा समाजाची बैठक घेण्यात आली. या बैठकीला विविध संघटनाचे पदाधिकारी, मराठा बांधव मोठय़ा संख्येने उपास्थित होते. यावेळी जिह्यातून एक हजार मराठा उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा ठराव करण्यात आला. येणाऱया दिवसात राजकारणासाठी गावबंदीपाठोपाठ घरबंदी करण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला आहे.