प्रक्षोभक वक्तव्यांविरोधात संताप, मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात मराठा समाज आक्रमक; मतदारसंघातच काढली अंत्ययात्रा

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करणारे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. आज मराठा कार्यकर्त्यांनी भुजबळांच्या येवला मतदारसंघातच त्यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध नोंदवला तर जळगावात भुजबळांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.

मराठा समाजाबद्दल बेताल वक्तव्य करून छगन भुजबळ यांनी त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढली आहे असा संताप व्यक्त करत येवला येथे मराठा कार्यकर्त्यांनी भुजबळांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. यावेळी छगन भुजबळ चले जाव, छगन भुजबळ मुर्दाबाद, मनोज जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है… अशा घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर  भुजबळांच्या प्रतिमेला जोडे मारून ती प्रतिमा जाळण्यात आली.

मंत्रिमंडळात संवैधानिक पदावर बसून एका विशिष्ट समाजाला टार्गेट करून जातीयवाद निर्माण करणाऱ्या भुजबळांचा आम्ही निषेध करतो तसेच जालन्यातील सभेला संबोधित करतांना मराठा समाजावर बेताल वक्तव्य करून भुजबळांनी राजकीय आत्महत्याच केली आहे, अशी प्रतिक्रिया मराठा कार्यकर्त्यांनी यावेळी दिली.

जळगाव शहरातील कोर्ट चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ भुजबळांविरुध्द निषेध आंदोलन करण्यात आले. सकल मराठा समाजातर्फे भुजबळांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले तसेच भुजबळांनी मराठा समाजाची जाहीर माफी मागावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. हे आंदोलन कोणत्याही समाजाविरुध्द नसून भुजबळांच्या वक्तव्याविरुध्द असल्याचेही यावेळी मराठा कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.

सोलापुरात प्रतिकात्मक व्यक्तीला बेडय़ा; पुतळ्याचे दहन

मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात सोलापूर जिह्यातील मराठा समाज आक्रमक झाला असून जुळे सोलापूर येथे एका व्यक्तीला भुजबळ यांचा तुरुंगातील पोशाख घालून हातात बेडय़ा व ताटात झुणका-भाकर देत त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तर सांगोला तालुक्यातील पाचेगाव खुर्द येथे भुजबळ यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
वडेट्टीवारांनीही साथ सोडली, म्हणाले…

भुजबळांच्या भूमिकेचे समर्थन नाही

जालनातील ओबीसी मेळाव्यात एकाच व्यासपीठावर छगन भुजबळ आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणाविरुध्द भाषणे ठोकली होती. परंतु त्यानंतर मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहून वडेट्टीवार यांनी अंग काढले आहे. भुजबळांच्या भूमिकेचे समर्थन आपण करत नाही, मी कॉंग्रेसची भूमिका घेऊन पुढे जाणार असे सांगतानाच, मराठा समाजाला आरक्षण देण्यास आपला विरोध नाही, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे.