मराठी वृत्तपत्र लेखक संघातर्फे ‘सामना’ दिवाळी अंकाचा गौरव

मराठी वृत्तपत्र लेखक संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या 49 व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत दैनिक ‘सामना’च्या दिवाळी अंकाला ‘गणेश केळकर स्मृती सर्वोत्कृष्ट साहित्यिक अंक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. दादर सार्वजनिक वाचनालय, धुरू हॉल ट्रस्ट, मराठी वृत्तपत्र लेखक संघ आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला.

आपल्या देशावर 700 वर्षांत अनेक आक्रमणे होऊनही हा देश स्वतःची संस्कृती जपत सर्वांना सामावून घेऊन उभा आहे. तसेच मराठीचे झाले आहे. आपली भाषा ही विस्तृत झाली आहे. मराठीतले अनेक शब्द इंग्रजीमध्ये प्रमाण म्हणून गेले आहेत. त्यामुळे मराठीच्या भविष्याबद्दलचा न्यूनगंड काढून टाका, असे प्रतिपादन लेखक, अभिनेते दीपक करंजीकर यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्रमाचे जनक नाशिकचे विनायक रानडे यांना ग्रंथालय चळवळीतील दिवंगत ज्येष्ठ कार्यकर्ते ‘स्व. दत्ता कामथे स्मृती ग्रंथसखा’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ज्येष्ठ स्तंभलेखक रविप्रकाश कुलकर्णी, दादर सार्वजनिक वाचनालयाच्या प्रमुख कार्यवाह शुभा कामथे, मराठी विचारधारा प्रतिष्ठानचे विश्वस्त अॅड. देवदत्त लाड, कार्याध्यक्ष रमेश सांगळे, कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर आणि कार्यवाह नितीन कदम यांनी केले.