राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणाला झोडपले, पिकांना फटका

गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या कडाक्यामुळे हैराण झालेल्या राज्यातील नागरिकांना शनिवारी अवकाळीचा तडाखा बसला. पुणे, सोलापूर, कोल्हापूर, धाराशीव, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगरसह कोकणातील काही भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्यामुळे बळीराजा चिंतेत आहे.

लातूर जिह्यातील शहर आणि ग्रामीण भागात शनिवारी दुपारपर्यंत कडक ऊन होते. अचानक वातावरणातील बदलामुळे दुपारनंतर अंधार दाटून आला. जोरदार वाऱयासह विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. कोपेगाव, गंगापूर तसेच निलंगा तालुक्यातील कासार शिरशी, हासोरी परिसरात गारांचा पाऊस पडला. त्यामुळे केशर आंब्याच्या बागांसह ज्वारीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर ग्रामीण भागात अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले.

पुणे, सातारा आणि कोकणातदेखील पावसाने दमदार बॅटिंग केली. धाराशीवच्या तुळजाभवानी मंदिरात पावसाचे पाणी साचले होते. कोल्हापुरात सलग दुसऱया दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली असून जिह्यातील तापमानाचा पारा 22 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला.

अक्कलकोटमधील दोन गावांची वाहतूक बंद

सोलापूर जिह्यातील अनेक भागांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. अक्कलकोट तालुक्यात अवकाळी पावसामुळे बसलेगाव ते गरोळगी या दोन गावांची वाहतूक बंद झाली. महामार्गावर पाणीच पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले.

अंगावर वीज पडून चिमुकलीचा मृत्यू 

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती गावातील शेतात वीज पडून लावण्या हनुमंता माशाळे या आठ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. लावण्या माशाळे हिला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेमुळे तालुक्यावर शोककळा पसरली आहे.