‘इंडिया’ची साथ सोडणार नाही, मोदी सरकारने दबाव टाकू नये; केजरीवाल यांचा पुन्हा ‘ईडी’ला ठेंगा

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Delhi CM and AAP National Convenor Arvind Kejriwal) यांना अंमलबजावणी संचालनालयाने कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी बोलावले होते. आज सोमवारी ईडी केजरीवाल यांची चौकशी करणार होती. मात्र केजरीवाल ईडी चौकशीला हजर राहणार नाहीत, असे आपने स्पष्ट केले आहे.

हे वाचा – अखेर काँग्रेस आणि आपचं जुळलं! दिल्लीसह हरयाणा, गोवा आणि गुजरातच्या जागावाटपाचे गणित सुटले

अरविंद केजरीवाल आज ईडी चौकशीसाठी जाणार नाहीत. हे प्रकरण सध्या न्यायालयात असून यावर पुढील सुनावणी 16 मार्च रोजी होणार आहे. त्यामुळे ईडीने दररोज समन्स पाठवण्याऐवजी न्यायालयाच्या निर्णयाची वाट पहावी, असे आपने म्हटले. तसेच आम्ही ‘इंडिया’ आघाडीची साथ सोडणार नाही. मोदी सरकारने दबाव निर्माण करू नये, असेही आपने बजावले आहे.

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांना ईडीने गेल्या चार महिन्यांत आतापर्यंत सात समन्स पाठवली आहेत. ईडीने केजरीवाल यांना पहिले समन्स 2 नोव्हेंबर 2023, दुसरे समन्स 21 डिसेंबर 2023, तिसरे समन्स 3 जानेवारी 2024, चौथे समन्स 18 जानेवारी 2024, पाचवे समन्स 2 फेब्रुवारी 2024, सहावे समन्स 17 फेब्रुवारी 2024 आणि सातवे समन्स 22 फेब्रुवारी 2024 ला पाठवले होते.

…तर अरविंद केजरीवाल यांना CBI-ED दोन दिवसात अटक करणार, ‘आप’चा दावा