मुंबईतील चोरीच्या मोटरसायकली नाशिकला

शहरातील गर्दीच्या ठिकाणाहून चोरलेल्या मोटरसायकली नाशिकला नेऊन विकी करणाऱयाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. कलीम कुरेशी असे त्याचे नाव असून त्याच्याकडून चोरीच्या 9 मोटारसायकली जप्त केल्या आहेत. त्याच्या अटकेने 8 गुह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

तक्रारदार हे अंधेरी येथे राहतात. त्याने गेल्या महिन्यात मरोळ परिसरात त्याची मोटरसायकल पार्क केली होती. त्याची मोटरसायकल चोरीला गेली होती. चोरीप्रकरणी त्याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड याच्या पथकातील उपनिरीक्षक यश पालवे यांच्या पथकातील काळे, पुजारी, नलावडे, पवार, चव्हाण, पवार यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.

एका फुटेजमध्ये कलीम हा मोटरसायकल चोरून जात होता. त्यानंतर तो कुर्ला कमानी, बैल बाजार, घाटकोपर येथील झोपडपट्टय़ांमधून मोटरसायकल घेऊन जात असल्याचे दिसले. तसेच एका फुटेजमध्ये कलीम हा मोटरसायकल धक्का मारत नेत असल्याचे दिसले. मोटरसायकल चोरणारा कलीम हा असल्याचे उघड झाले. पोलिसांनी तपास करून कलीमला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्याने गुह्याची कबुली दिली. कलीम हा चोऱया करण्यासाठी मुंबईत येत असायचा. गर्दीच्या ठिकाणी असलेल्या तो मोटरसायकली तो चोरायचा. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी तो झोपडपट्टय़ांमधून जेथे कॅमेरे नाहीत अशा ठिकाणाहून जात असायचा. त्यानंतर तो वर्दळीच्या ठिकाणी मोटरसायकल पार्क करायचा. चार तास वाट पाहिल्यावर तो ती मोटरसायकल घेऊन नाशिकला जायचा तेथे गेल्यावर चोरलेल्या मोटरसायकलचा नंबर बदलून त्याची कमी किमतीत विक्री करायचा. अर्धी रक्कम घेतल्यानंतर मोटरसायकलचे पेपर नंतर देतो असे सांगून तो पळून जायचा अशी त्याची गुह्याची पद्धत होती. फसवणुकीच्या पैशांतून तो मौजमजा करत असायचा. कलीमविरोधात साकीनाका आणि कुरार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.