महापालिकेच्या ‘फ्लॉव्हर शो’ला दीड लाख मुंबईकरांची हजेरी

वाघ, झेब्रा, अस्वल यांच्या पुष्प प्रतिकृतीसोबत सेल्फीसाठी गर्दी

आपल्या आवडत्या कार्टून कॅरॅक्टर्सच्या फुलांपासून बनवलेल्या प्रतिकृतीबरोबरच सेल्फीसाठी उडालेली झुंबड, विविध रंगांच्या फुलांना फोटोत टिपण्यासाठी घाई आणि रोपांची माहिती मिळवण्यासाठीची लगबग… असे वातावरणात भायखळा येथील वीरमाता जिजाबाई वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात भरलेल्या फ्लॉव्हर शोच्या आज शेवटच्या दिवशीही कायम होते. आज विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह सुमारे दीड लाखाहून अधिक मुंबईकरांनी या पुष्पोत्सवाला भेट दिली.

मुंबई महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या वतीने वार्षिक उद्यानविद्या प्रदर्शनाचे 2 ते 4 फेब्रुवारी 2024 दरम्यान आयोजन करण्यात आले. यंदाच्या पुष्पोत्सवासाठी ‘ऑनिमल किंग्डम’ ही संकल्पना घेऊन उद्यान विभागाने हत्ती, वाघ, झेब्रा, अस्वल आदी प्राण्यांच्या पुष्पप्रतिकृती साकारल्या. फळांच्या विविध प्रजातींची रोपटे, रंगबेरंगी फुलझाडे, वनस्पती औषधींचा समावेश होता. यासाठी तब्बल 10 हजार पुंडय़ांचा वापर करण्यात आला. पाना-फुलांपासून साकारलेले उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळ साकारण्यात आलेले ‘चांद्रयान’ विशेष आकर्षणाचे पेंद्रबिंदू ठरले. महापालिका आयुक्त-प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त किशोर गांधी, प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या देखरेखीखाली आयोजित उपक्रमाला पर्यटकांनी उदंड प्रतिसाद दिला.

मान्यवरांनीही लावली हजेरी 

प्रदर्शनाला जपान, मलेशिया, पॅनडा, मॉरिशस या देशांच्या राजदूतांसोबतच अतिरिक्त मुख्य न्यायाधीश मंजुषा देशपांडे, अभिनेता रणजित, पवन मल्होत्रा, एकता जैन, ज्येष्ठ क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर आदी दिग्गजांनीही भेट दिली. प्रदर्शनासोबतच उद्यानविषयक वस्तूंची विक्री, फुले-फळे झाडांसाठी लागणारे खत यासाठी मुंबईकर आणि पर्यावरणप्रेमींनी मोठी गर्दी केली.