सलग दुसऱया दिवशी एक्सप्रेस वे जाम

फाईल फोटो

विकेंड व स्वातंत्र्य दिनास जोडून आलेल्या सलग सुट्टय़ांमुळे लोणावळा परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. पर्यटकांच्या प्रचंड गर्दीमुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बोरघाटात सलग दुसऱया दिवशी पर्यटकांना वाहनकोंडीस सामोरे जावे लागले.

पर्यटकांच्या वाहनांमुळे शनिवारी व रकिवारी बोरघाटात द्रुतगती मार्गावरील वाहतूक कासवगतीने सुरू होती. रविवारीही पर्यटक मोठय़ा संख्येने बाहेर पडल्याचे चित्र होते. पुण्याच्या दिशेने येणाऱया वाहनांच्या रांगा जवळपास दोन ते तीन किलोमीटर अंतरापर्यंत लागल्याचे पहावयास मिळाले. मुंबई-पुणे लेनवरील वाहतूक अमृतांजन पूल अंडा पॉइंट, दस्तुरीच्याही पुढे गेली. पर्यटनासाठी बाहेर पडलेल्या पर्यटकांना बोरघाटात वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागल्याने मनस्ताप सहन करावा लागला. वाहतुकीवर ताण आल्याने वाहतूक सुरळीत करताना कर्मचाऱयांची तारांबळ उडाली.

लोणावळा परिसरातील भुशी धरण, राजमाची, लोहगड, एकविरा-भाजेलेणी परिसर, पवना धरण परिसरात सर्व मोसमामध्ये पर्यटक गर्दी करीत असतात.