मुंबई उपनगर बॉक्सिंग संघटनेची हायकोर्टात धाव; महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या निर्णयाविरोधात याचिका

मुंबई उपनगर बॉक्सिंग संघटना बरखास्त करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे माजी हंगामी अध्यक्ष रणजीत सावरकर आणि माजी महासचिव राकेश तिवारी यांच्याविरुद्ध मुंबई उपनगर बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र तावडे यांनी याचिका दाखल केली आहे. ही याचिका गुरुवारी न्यायालयाने सुनावणीसाठी दाखल करून घेतली.

याचिकाकर्ते जितेंद्र तावडे यांच्यातर्फे ऍड. मनोज पिंगळे यांनी ही याचिका न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती मिलिंद साठे यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणली. महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या हंगामी अध्यक्ष व महासचिवांचा कार्यकाल डिसेंबर 2022 मध्येच संपला. त्यानंतर त्यांनी मुंबई उपनगर बॉक्सिंग संघटनेसह चार संघटना बरखास्त केल्या. याचा राज्यातील बॉक्सर्ससह दहावी-बारावी विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला आहे. बॉक्सिंग संघटनाच अस्तित्वात नसल्यामुळे विद्यार्थ्यांना क्रीडा कौशल्याबद्दल गुण मिळणे कठीण झाले आहे.

मुंबई उपनगरातील बॉक्सर्सचे प्रचंड नुकसान होत आहे, याकडे ऍड. पिंगळे यांनी लक्ष वेधले. त्यांच्या युक्तिवादाची गंभीर दखल घेत खंडपीठाने सुनावणी घेण्यास तयारी दर्शवली. महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना व मुंबई उपनगर बॉक्सिंग संघटनेतील या लढय़ात न्यायालय काय निर्णय देते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

हंगामी अध्यक्ष-महासचिवांचे डिसेंबर 2022 नंतरचे निर्णय रद्द करा

महाराष्ट्र बॉस्ंिग संघटनेमध्ये रणजीत सावरकर आणि राकेश तिवारी यांचा कार्यकाल संपला असल्यामुळे ते मुंबई उपनगर बॉक्सिंग संघटना बरखास्त करू शकत नाहीत. याच पार्श्वभूमीवर 29 डिसेंबर 2022 नंतर रणजित सावरकर आणि राकेश तिवारी यांनी घेतलेले निर्णय अवैध असून ते निर्णय रद्द करण्याबाबत न्यायालयाने निर्देश द्यावेत, अशी विनंती याचिकेत केली आहे.

याचिकेत काय म्हटलेय

– महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना निवडून आलेल्या अध्यक्षांशिवाय सहा महिन्यांपलीकडे कार्यरत राहू शकत नाही.

– मागील निवडणुकीत निवडून आलेले अध्यक्ष जय कवळी यांनी 18 जून 2022 रोजी पदाचा राजीनामा दिला.

– त्यानंतर 18 डिसेंबर 2022 पर्यंत रणजीत सावरकर हे हंगामी अध्यक्षपद भूषवू शकतात.

-चार वर्षांचा कार्यकाल संपल्यामुळे महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचा कार्यकाल 29 डिसेंबर 2022 रोजी संपुष्टात आला आहे.

– अशा परिस्थितीत राकेश तिवारी यांनी ‘कारणे दाखवा’ नोटीस न देता याचिकाकर्ते तावडे यांना मुंबई उपनगर बॉक्सिंग संघटनेच्या अध्यक्षापदावरून निलंबित केले.