थर्टी फर्स्ट करा, पण दमानं आणि संयमानं! मुंबईत 5 जानेवारीपर्यंत जमावबंदी; फटाके, बँड, लाऊडस्पीकर्सलाही मनाई

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असून नववर्षाच्या स्वागताची जोरदार तयारी मुंबईसह राज्यभरात सुरू आहे. हॉटेल्स, रिसॉर्ट, पब यांचे बुकिंग हाऊसफुल्ल आहे. मिंधे सरकारने नववर्षाचे निमित्त साधून तळीरामांसाठी थर्टी फर्स्टला पहाटे पाच वाजेपर्यंत बीयर बार, परमीट रूम सुरू ठेवण्याची तर मद्य विक्रीची दुकाने रात्री एक वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देत चिअर्स केले. त्यामुळे रात्रभर ग्लासाला ग्लास भिडतील, हॉटेल्स आणि पब चौपाटय़ा प्रचंड गजबजतील….परंतु, पोलिसांनी 5 जानेवारीपर्यंत शहरात जमावबंदी लागू केली आहे. तसेच लाऊडस्पीकर्स, बँड आणि फटाकेही वाजवण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे थर्टी फर्स्ट करा, पण दमानं आणि संयमानं… जल्लोष करा, पण नियमांचेही भान ठेवा, असा पोलिसांचा स्पष्ट इशारा आहे.

थर्टी फर्स्टनिमित्त गर्दीचा मौका साधून घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काही संशयास्पद आढळल्यास अथवा आवश्यक मदत हवी असल्यास तात्काळ पोलीस मदतीसाठी 100 क्रमांकावर संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे.

उद्या मध्य आणि हार्बरवर मेगाब्लॉक

उपनगरीय रेल्वे मार्गावरील रुळांच्या दुरुस्तीबरोबरच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे थर्टी फर्स्टनिमित्त घराबाहेर पडणाऱयांची कोंडी होऊ शकते. मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱया जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. ठाण्याच्या पुढे या जलद गाडय़ा डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.

हार्बर मार्गावर पनवेल-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. ब्लॉक कालावधीत पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणाऱया अप हार्बर मार्गावरील लोकल आणि सीएसएमटी येथून पनवेल, बेलापूरकडे जाणाऱया डाऊन हार्बर मार्गावरील लोकल रद्द असणार आहेत. पनवेल येथून ठाणेकरिता सुटणाऱया अप ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल आणि पनवेल येथून ठाणेकरिता सुटणाऱया डाऊन मार्गावरील लोकल रद्द असणार आहेत.

मुंबईसह उपनगरात 5 जानेवारीपर्यंत जमावबंदी लागू केली आहे. या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींच्या कोणत्याही संमेलनास प्रतिबंध राहील. मिरवणूक काढणे, मिरवणुकीत लाऊडस्पीकर, वाद्ये, बॅण्ड आणि फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे.

असा आहे आदेश
विवाह समारंभ, अंत्यविधी कार्यक्रम, कंपन्या, सहकारी संस्था आणि अन्य संस्था व संघटनांच्या कायदेशीर बैठका, क्लबमध्ये होणारे कार्यक्रम, सामाजिक मेळावे, सहकारी संस्था, इतर सोसायटय़ा आणि संघटना यांच्या बैठकांना या बंदी आदेशातून वगळण्यात आले आहे.

साध्या वेशातील पोलिसांची करडी नजर
दारू ढोसून वाहन चालवणारे तळीराम, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणारे माथेफिरू, महिलांची छेडछाड करणारे टपोरी, अनधिकृत दारू विकणाऱया आस्थापना, अंमली पदार्थांची विक्री करणारे पेडलर्स व नशा करणारे नशेबाज यांच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. साध्या वेशातील पोलीस सर्व ठिकाणांवर करडी नजर ठेवणार असल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले.

धूमस्टाईल भारी पडणार
ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात येणार असून गस्त वाढवण्यात येणार आहे. फिक्स पॉईंट नेमण्यात येणार. वाहतूक नियमांचे उल्लंघन व ‘ड्रंक ऍन्ड ड्राईव्ह’विरोधात विशेष मोहीम राबविणार. त्यामुळे तर्राट होऊन गाडी चालवणे, धुमस्टाईलने बाईक चालवणे महागात पडेल.

कडेकोट बंदोबस्त
नववर्षाचे स्वागत सुरक्षित आणि निर्विघ्नपणे करता यावे यासाठी 22 पोलीस उपायुक्त, 45 सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्यासह दोन हजार 51 पोलीस अधिकारी व 11 हजार 500 पोलीस अंमलदार असा फौजफाटा तैनात करण्यात येणार. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी एस.आर.पी.एफ. प्लाटून, क्युआरटीची पथके, आरसीपी, होमगार्डस् असा बंदोबस्त असणार आहे.