नगर शहरात पाणी नसल्याने नागरिक आक्रमक, नगरपरिषद कार्यालयासमोर घागरफोड आंदोलन

शहरातील आदर्शनगर भागाला नगरपरिषदे कडून चार महिन्यांपासून पिण्याचे पाणी मिळत नसल्याने येथील नागरिकांनी आक्रमक होत नगरपरिषदेचा निषेध म्हणून नगरपरिषद कार्यालयासमोर घागर फोड आंदोलन केले. सध्या पाण्याची तीव्रतांचाई सुरू असून पाण्यासाठी या भागातील नागरिकांना मोठी भटकंती करावी लागत आहे. वारंवार आदर्शनगर येथील रहिवाशांनी पाण्याबाबत तक्रारी करून सुद्धा पाणी मिळत नसल्याने गुरुवारी दुपारी या भागातील नागरिकांनी नगरपरिषदेसमोर घागर फोडून अनोखे आंदोलन केले.

गेली चार महिन्यापासून या भागाला पाणी मिळत नाही. पाणीपट्टी घरपट्टी हे नियमित चालू आहे. सध्या आम्हाला पाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहे. पाणी येत नसल्याने जानेवारी महिन्यापासून या भागातील पिण्याचे पाण्याचे टँकर सुमारे एक हजार ते दीड हजार रुपये इतक्या दराने विकत घेण्याची वेळ नगरपरिषदेच्या गलथान कारभारामुळे आली आहे. मोठा आर्थिक भुर्दंड नागरिकांना पडत आहे. याची जाणीव नगरपरिषद पाणी पुरवठा विभाग घेत नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही पाण्याचा प्रश्न सातत्य पूर्णपणे नगरपरिषदेकडे मांडत आलो. मात्र फक्त उडवाउडवीचे उत्तर नगरपरिषदेकडून देण्यात आले सध्या पाण्याचा शहराचा तालुक्यात मोठ्या प्रमाणात गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात हा प्रश्न हाताळण्यास पालिका प्रशासन निष्क्रिय ठरत आहे.

लोकांच्या पाण्याचे प्रश्नांची काळजी नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी घेत नाही.आदर्श नगर येथील लोक पाण्याचा प्रश्न घेऊन नगरपरिषद कार्यालयात आली की, तेवढ्या पुरते वेळ काढून वेळ मारून घेऊन जाण्याचे काम आतापर्यंत झाले आहे. उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न उद्भवणार होता त्यापूर्वीच नगरपरिषदने पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना केल्या नाही असाही आरोप नागरिकांनी यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे यांच्या बरोबर झालेल्या चर्चा दरम्यान केला आहे. मुख्याधिकारी लांडगे यांनी लेखी आश्वासन देऊन आपला पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.