कोरोना महासंकटातही ट्रान्स हार्बर उभा राहिला हे गौरवास्पद! महाविकास आघाडी सरकारचे पंतप्रधान मोदींकडून अप्रत्यक्ष कौतुक

देशात सर्वात मोठा सागरी सेतू असलेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) म्हणजेच शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. कोरोना महासंकटातही इतक्या भव्य आणि महत्त्वाच्या प्रकल्पाचे काम झाले हे गौरवास्पद असल्याचे सांगत पंतप्रधानांनी यावेळी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारची अप्रत्यक्षपणे प्रशंसा केली. छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करताना मुंब्रा देवी, सिद्धिविनायकाला प्रणाम करून अटल सेतू मुंबईकरांसाठी समर्पित करतो, असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल सेतूबरोबरच 33 हजार कोटींच्या विविध विकासकामांचे उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण करण्यात आले. महाविकास आघाडी सरकारने ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पासाठी भरघोस निधी दिला होता. तसेच हा प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे सातत्याने पाहणी करून या प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेत होते. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरही तातडीने त्याचे लोकार्पण व्हावे यासाठीही शिवसेनेने पाठपुरावा केला होता.

पंतप्रधान मोदी यांनी आज ट्रान्स हार्बर लिंकचे लोकार्पण करतानाच या सागरी सेतूची पाहणीही केली. अटल सेतू हा विकसित हिंदुस्थानचे प्रमाण असून देशाच्या विकासासाठी समुद्रालाही टक्कर देऊ, लाटांनाही भेदून टाकू हे या प्रकल्पाने दाखवून दिले आहे, अशा शब्दांत पंतप्रधानांनी या प्रकल्पाचे काwतुक केले.

दोन कोटी महिलांना लखपती बनविणार
येत्या काही वर्षांत आपण देशातील दोन कोटी महिलांना लखपती दीदी बनविणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली.

दि. बा. पाटील यांचा विसर
नवी मुंबईच्या नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मैदानात आयोजित कार्यक्रमात भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लोकनेते दि. बा. पाटील यांचा विसर पडला. आता रायगड व नवी मुंबई देशाला ताकद देतील. देशातील 65 टक्के डेटा बँक या परिसरात आहे. या भागात विमानतळ होत आहे. त्याचे भूमिपूजनही पंतप्रधान मोदी यांनी केले. यापूर्वी हा विमानतळही सुरू होईल, असा उल्लेख देवेंद्र फडणवीस यांनी केला. पण यावेळी भाषणे करताना सर्व नेत्यांना दि. बा. पाटील यांच्या आठवणीचा विसर पडल्याचे जाणवले.

पोलिसांचा उपाशीपोटी बंदोबस्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी सुमारे साडेचार हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकारी बंदोबस्तासाठी तैनात होते. सकाळपासून उन्हातान्हात आपले कर्तव्य बजावणाऱया पोलिसांना दुपारचे जेवण लवकर मिळाले नाही. सुरुवातीला जेवण आले ते अपुरे होते. त्यामुळे पोलिसांवर जेवणाची वाट पाहण्याची वेळ आली.

शिंदे, गद्दारी केली तुम्ही
शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूच्या उद्घाटनासाठी आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाडीपाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी होती. यावेळी गर्दीतून त्या नेत्यांना हाका मारण्यात आल्या. शिंदे शिंदे असे म्हणत गद्दारी केली तुम्ही, असे शिंदे यांना एकाने सुनावले.

‘अटल सेतू’ आजपासून खुला होणार..!
अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रार्पण करण्यात आले. हा ‘अटल सेतू’ आजपासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे, असे एमएमआरडीएच्या वतीने कळविण्यात आले आहे.

शिवसेनेच्या संकल्पनेतील कोस्टल रोडचीही प्रशंसा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी मुंबईतील कोस्टल रोडचीही प्रशंसा केली. कोस्टल रोडमुळे मुंबई महानगरातील कनेक्टिव्हिटीचा कायापालट होईल, असे ते म्हणाले. या कोस्टल रोडची मूळ संकल्पनाही शिवसेनेची आहे. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून कोस्टल रोड उभारला जात आहे.

पुढील वर्षी पहिली बुलेट ट्रेन धावणार
गेल्या वर्षी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाले. नवी मुंबई विमानतळ आणि कोस्टल रोडचे काम प्रगतिपथावर आहे. ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्हला जोडणाऱया भूमिगत रस्त्याची आज पायाभरणी करण्यात आली. येणाऱया वर्षात मुंबईला पहिली बुलेट ट्रेन मिळणार आहे. दिल्ली-मुंबई कॉरिडॉर महाराष्ट्राला उत्तर आणि मध्य हिंदुस्थानशी जोडेल, असेही मोदी म्हणाले.