नवज्योतसिंग सिद्धू निवडणुकीच्या धामधुमीपासून दूर; आता कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसणार

काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू आता पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात परतणार आहेत. मात्र, आता ते कॉमेट्री बॉक्समध्ये समालोचन करणार आहेत. 22 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल सामन्यासाठी सिद्धू समालोचन करणार आहेत. स्टार स्पोर्ट्सने याबाबतची माहिती दिली आहे. देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना ऐन निवडणुकीच्या काळात सिद्धू राजकीय रिंगणाऐवजी क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहेत.

महान क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धी आमच्या स्टारकास्टमध्ये सहभागी होत आहेत, अशी पोस्ट स्टार स्पोर्टने करत सिद्धू आयपीएल सामन्यांचे समालोचन करणार असल्याची माहिती दिली आहे. सिद्धू यांच्या समालोचनाने आयपीएलच्या प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन होणार आहे. मात्र, ते राजकारणापासून दूर असल्याने त्याचीही चर्चा होत आहे. सिद्धू यांनी 2004 मध्ये राजकारणात प्रवेश केला होता. ते भाजपचे खासदार होते.त्यानंतर भाजपला सोडचिठ्ठी देत ते काँग्रेसमध्ये दाखल झाले. काँग्रेसमध्ये नाराज असल्यानेच ते राजकारणापासून दूर असल्याची चर्चा आहे.

सिद्धू यांनी या चर्चेत काहीही अर्थ नसल्याचे म्हटले आहे. सिद्धू यांनी पटियाला मतदारसंघातून काँग्रसकडून निवडणूक लढवावी, यावर काँग्रेसमध्ये विचार सुरू होता. मात्र, पत्नीच्या प्रकृती अस्वास्थाचे कारण देत सिद्धू यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, आता सिद्धू क्रिकेटच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसणार असल्याने क्रिकेटरसिकांना समालोचनाचा आनंद मिळणार आहे.