मोदी राजवटीत रेल्वे प्रवास म्हणजे शिक्षाच; राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान शुक्रवारी झाले आहे. आता सर्वच राजकीय पक्ष दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला लागले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर हल्लाबोल करत असतात. आता ट्रेनमध्ये होणारी गर्दी आणि असुविधा यावरून राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केले आहे. रेल्वेकडे जाणूवपूर्वक दुर्लक्ष करून ती त्यांच्या मित्रांना विकण्याचा जाव असल्याचा इशाराही राहुल गांधी यांनी दिला. याबाबत त्यांनी व्हिडीओ शेअर करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांनी एक्सवर व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ट्रेनच्या डब्यात गर्दी दिसत आहे. ट्रेनच्या टॉयलेटमध्ये, पॅसेजमध्ये, दरवाज्यात जिथे जागा मिळेल तिथे प्रवासी बसलेले आहेत. रेल्वेच्या या डब्यात प्रंचड गर्दी असल्याने तिथे पाय ठेवायलाही जागा नाही, असे व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. हा व्हिडीओ केरळ एक्सप्रेसचा असल्याची माहिती मिळाली आहे.

नरेंद्र मोदी यांच्या राजवटीत ‘रेल्वे प्रवास’ ही शिक्षाच आहे. ट्रेनमधून जनरल डबे कमी करून केवळ ‘एलिट ट्रेन्स’चा प्रचार करणाऱ्या मोदी सरकारच्या कारकिर्दीत प्रत्येक श्रेणीतील प्रवाशांचा छळ होत आहे. प्रवाशांकडे कन्फर्म तिकीट असूनही त्यांना प्रचंड गर्दीमुळे त्यांच्या जागेवर नीट बसताही येत नाही. तसेच अनेकजण जमिनीवर, पॅसेजमध्ये आणि शौचालयात बसून लपून प्रवास करतात. मोदी सरकार जाणीवपूर्वक ट्रेनकडे दुर्लक्ष करत आहे. मोदी सरकारला रेल्वेला तोट्यात ढकलायचे असून अयोग्य सिद्ध करायचे आहे. त्यानंतर ही ट्रेन सेवा त्यांना त्यांच्या मित्रांना विकता येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आपल्या हक्काची प्रवासी ट्रेन वाचवायची असेल तर रेल्वेला उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न करणाऱ्या मोदी सरकारला हटवावे लागेल, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.