अजितदादांनी यूएनचे अध्यक्ष म्हणून पत्र पाठवले तरी फरक पडणार नाही; शरद पवारांचा टोला

अजित पवार यांनी सत्तेत 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर जनतेला उद्देशून एक पत्र लिहिले. त्यात त्यांनी स्वतःचा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असा केला. त्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सणसणीत टोला लगावला आहे. अजितदादांनी यूएनचे अध्यक्ष म्हणून जरी पत्र पाठवले तरी काही फरक पडणार नाही, असा चिमटा शरद पवार यांनी काढला. मुख्यमंत्री पदावरूनही त्यांनी खिल्ली उडवली.

अजितदादा गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. शरद पवार यांना पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यायचाच नव्हता. सुप्रिया सुळे यांना अध्यक्षपदी बसवून भाजपसोबत जाण्याचा त्यांचा डाव होता, असे भुजबळ यांनी म्हटले होते. त्याला शरद पवार यांनी चोख प्रत्युत्तर दिले. शरद पवार म्हणाले, सुप्रिया सुळेंना राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्ष करा असा प्रस्ताव खुद्द छगन भुजबळ यांनीच दिला होता, असे सांगून भुजबळ यांच्या आरोपातील हवाच काढून टाकली. अध्यक्ष पदासाठी सुप्रिया सुळे स्वतः इच्छुक नव्हत्या. हा आमचाही प्रस्ताव नव्हता असेही ते म्हणाले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अनिल देशमुख, डॉ. संतोष कोरपे आणि गुलाबराव गावंडे उपस्थित होते.

भाजपसोबत जाण्यास नकारच

काही सहकाऱयांचा आपण भाजपसोबत जावे, असा आग्रह होता. परंतु माझा त्यासाठी स्पष्ट शब्दांत नकार होता. भाजपचा विचार हा देशाच्या हिताचा नाही, समाजात, जातीधर्मांत फूट पाडून भाजपचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे भाजपसोबत जाण्यास आपला स्पष्ट नकार असल्याचे सहकाऱयांना सांगितले होते. तरीही काहींनी भाजपसोबत जाण्यावर आग्रह धरला. मी राजीनामा दिल्यानंतर कमिटीची स्थापना केली होती. तेव्हा छगन भुजबळ यांनीच सुप्रियांना अध्यक्ष करा, असा प्रस्ताव दिला होता, असे पवार यांनी सांगितले.

70 टक्के भागात भाजप नाही

राज्यात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेचे राज्य पुन्हा येऊ शकते. अनेक राज्यांमध्ये भाजपचे अस्तित्व नाही. 70 टक्के भागात भाजप नाही. सध्या सत्ताधाऱयांविरोधात वातावरण आहे. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसेल, असा अंदाजही शरद पवार यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केला.

‘इंडिया’चा पंतप्रधान पदासाठी चेहरा नाही

लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या वतीने पंतप्रधान पदासाठीचा चेहरा देण्याची आवश्यकता नाही. 1977 साली झालेल्या निवडणुकीत कुणी चेहरा नव्हता. परिवर्तन पाहिजे ही भावना लोकांमध्ये होती. आताही देशातील लोकांमध्ये आम्हाला भाजपची सत्ता नको, पर्याय हवा आहे, ही भावना आहे, अशी भूमिका शरद पवार यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना मांडली.

राष्ट्रवादीत फूट नाही

राष्ट्रवादीतील फुटीच्या प्रश्नावर शरद पवार यांनी पक्षात फूट पडलेलीच नसल्याचा पुनरुच्चार केला. राष्ट्रवादीत फूट पडलेली नसून केवळ काही नेते आणि आमदारांनी वेगळी भूमिका घेतली आहे. आजही आमचे ते म्हणणे आहे. निवडणूक आयोग आणि न्यायालयातदेखील आम्ही हीच भूमिका घेतल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

प्रकाश आंबेडकर यांना ‘इंडिया’त घेण्याबाबत सकारात्मक

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा इंडिया आघाडीत समावेश होणार की नाही? याबाबत शरद पवार म्हणाले, प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत घेण्याबाबत सकारात्मक आहोत, लवकरच याबाबत इंडिया आघाडीची बैठक होईल. सर्वांशी चर्चा करूनच याबाबत निर्णय होईल, असे शरद पवारांनी सांगितले.