शेअर बाजाराने गाठली सर्वोच्च पातळी; गुंतवणुकदारांची 1.57 लाख कोटींची कमाई

शेअर बाजारात सध्या तेजीचे वातावरण आहे. निफ्टीने जबरदस्त कामगिरी करत ऐतिहासिक 20 हजाराचा टप्पा गाठला होता. त्यानंतर निष्टीत घसरण झाली होता. मात्र, बुधवारी निफ्टीने परत ऐतिहासिक कामगिरी करत बाजार बंद होतानाही 20 हजारावरचा निर्देशांक कायम ठेवला आहे. ही निफ्टीची सर्वोच्च पातळी आहे. शेअर बाजाराच्या या घोडदौडीमुळे अनेक गुंतवणुकदार मालामाल झाले आहेत. या तेजीत गुंतवणुकदारांची 1.57 लाख कोटींची कमाई झाली आहे.

शेअर बाजारात बुधवारीही तेजी कायम होती. निफ्टी पहिल्यांदाच 20,000 अंकांच्या वर बंद झाला. सेन्सेक्सही 245 अंकांच्या उसळीसह आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर बंद झाला. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.57 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. स्मॉल कॅप शेअर्समध्ये बुधवारी सर्वाधिक खरेदी दिसून आली. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये टेलिकॉम, एनर्जी, कंझ्युमर ड्युरेबल, मेटल, तसंच ऑईल आणि गॅस शेअर्सचे निर्देशांक 1 टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले. आयटी, ऑटो आणि कॅपिटल गुड्सच्या समभागांमध्ये विक्री दिसून आली.

बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा बीएसई निर्देशांक सेन्सेक्स 245.86 अंकांनी 0.37 टक्क्यांनी वाढून 67,466.99 वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 76.80 अंक 0.38 टक्क्यांच्या वाढीसह 20,070.00 च्या पातळीवर बंद झाला. ही आतापर्यंतची सर्वोच्च पातळी आहे. या तेजीमुळे गुंतवणूकदारांची 1.57 लाख कोटींची कमाई झाली झाली.

सेन्सेक्समधील 30 पैकी 15 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्येही भारती एअरटेलच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 2.72 टक्क्यांची वाढ झाली. टायटन, इंडसइंड बँक, अॅक्सिस बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेअर्सही वाढीसह बंद झाले. तर महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअरमध्ये 1.35 टक्क्यांची घसरण झाली. याशिवाय लार्सन अँड टुब्रो, नेस्ले इंडिया, जेएसडब्ल्यू स्टील आणि इन्फोसिसच्या शेअर्समध्ये 0.53 टक्क्यांपासून ते 1.08 टक्क्यांची घसरण दिसून आली.