मुंबईकर उत्तरभारतीयांची भाजपविरुद्ध नाराजी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांवर लक्ष केंद्रित केले असून उत्तर भारतीयांना जवळ करण्यास सुरुवात केली आहे, पण भाजपने आतापर्यंत मुंबईतल्या उत्तर भारतीय नेत्यांना कधीही सत्तेत सहभागी करून घेतले नाही. उलट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व काँग्रेसने उत्तर भारतीयांना नेहमीच सत्तेत वाटा दिला. भाजपने फक्त आमच्या मतांवर डोळा ठेवला. मात्र सत्तेत वाटा दिला, अशी चर्चा आता उत्तर भारतीयांमध्ये सुरू झाली आहे.

भाजपने मुंबईतल्या उत्तर भारतीयांना नेहमी चुचकारले आहे. भाजपची मते आमच्याच पारडय़ात पडतात असा दावा केला जातो, पण भाजपने आतापर्यंत उत्तर भारतीयांना कधीही सत्तेत सहभागी करून घेतलेले नाही, असे भाजपच्या एका उत्तर भारतीय नेत्याने पत्रकारांशी खासगीत बोलताना उदाहरणांसह दाखवून दिले. भाजपच्या मुंबई अध्यक्षपदासारख्या महत्त्वाच्या पदावर भाजपने उत्तर भारतीय नेत्याला कधीही नियुक्त केलेले नाही, याकडे मुंबईतल्या उत्तर भारतीयांच्या एका नेत्याने लक्ष वेधले. मुंबई महापालिकेत शिवसेनेसोबत भाजपची वीस ते पंचवीस वर्षे सत्ता होती, पण पालिकेत उत्तर भारतीय नगरसेवकाला गटनेता म्हणून कधीही नियुक्त केले नाही. मुंबईतील उत्तर भारतीयांचे नेते म्हणून मिरवणारे कृपाशंकर सिंह यांना भाजपने मुंबईतून उमेदवारी न देता उत्तर प्रदेशातल्या जौनपूरमधून लोकसभेची उमेदवारी दिली. भाजपने अभिराम सिंह यांना आमदार केले, पण कधी मंत्री केले नाही. आता राज्यात शिंदे-फडणवीस-अजित पवार यांचे ट्रिपल इंजिन सरकार आहे, पण या मंत्रिमंडळातही उत्तर भारतीय चेहरा नाही. भाजप आपल्याला सत्तेत सहभागी करून घेत नसल्याची खदखद उत्तर भारतीयांमध्ये आहे.

45 लाख उत्तर भारतीय मतदार
मुंबईत उत्तर भारतीयांची संख्या सुमारे 35 लाख आहे आणि 28 लाख मतदार आहेत. मुंबईतील उत्तर भारतातील मुस्लिम मतदारांची संख्याही मोठी आहे. उत्तर भारतीय व मुस्लिम मिळून मुंबईत 45 लाखांच्या आसपास लोकसंख्या आहे.

शिवसेनेकडून अनेकांना संधी
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना संधी दिल्याची अनेक उदाहरणे आहेत. घनश्याम दुबे यांना विधान परिषदेवर पाठवले. संजय निरुपम यांना शिवसेनेने दोनवेळा राज्यसभेवर संधी दिली. आता प्रियांका चतुर्वेदी यांना शिवसेनेने राज्यसभेवर प्रतिनिधित्व दिले आहे. उत्तर भारतीय संघाचे अध्यक्ष संतोष सिंह यांना चांदिवलीमध्ये विधानसभेची उमेदवारी दिली होती. काँग्रेसनेही उत्तर भारतीयांना संधी दिली. काँग्रेस नेते मुरली देवरा व गुरुदास कामत यांनी उत्तर भारतीय नेत्यांवर विश्वास टाकून सत्तेत सहभागी करून घेतले आहे. पक्षात मोठी पदे दिली आहेत. रामनाथ पांडे, चंद्रकांत त्रिपाठी, मनोहर त्रिपाठी, रमेश दुबे, कृपाशंकर सिंह यांच्या जोडीला नसीम खान, जावेद खान यांना संधी दिली. राज्यमंत्री पदावरही नियुक्त केले होते. राजहंस सिंह हे काँग्रेसमध्ये होते तेव्हा आठ वर्षे पालिकेत विरोधी पक्षनेते पदावर ठेवले होते.