मकरसंक्रांतीनिमित्त सुगड्यांची मागणी वाढली; कामाला वेग

मकरसंक्रातीचा सण महिन्याभरावर आला आहे. त्यामुळे अवसरी बुद्रुक ( ता. आंबेगाव) येथील कुंभारवाड्यात तयार होणाऱ्या मातीच्या सुगड्यांना जिल्ह्यातुन मागणी वाढल्याने सुगडी बनविण्याच्या कामाने वेग घेतला आहे.

संपुर्ण कुंभारवाड्यातील एकुण सहा कुटुंबामधुन सुमारे दोन लाखाहुन आधिक सुगडी तयार झाली आहेत. पुढील आठवडाभरात अजुन लाखभर सुगडी तयार होतील. पारंपारिक लाकडी चाकावर सुगडी बनवत असताना येथील कारगिरांनी विजेवर चालणाऱ्या मोटारीवरील चाकावर सुगडी बनविण्यास सुरवात केल्याने उत्पादनात वाढ झाली आहे. संक्रातीला पुजा करण्यासाठी वाण म्हणुन महीला वापरत असलेल्या मातीची सुगडी बनविण्याच्या कामाला येथील कुंभारवाड्यात दिवाळीनंतर सुरवात होते.येथील काही कुंभार व्यावसायिकांनी पारंपारिक सुगडी बनवत असताना त्याला व्यावसायिक स्वरुप देत संपुर्ण पुणे जिल्ह्यात सुगड्यांना ठोक स्वरुपात ग्राहक शोधण्याचे काम केले.

यामुळे याला व्यापाऱ्यांकडूनही चांगला प्रतीसाद मिळाला. खेड, जुन्नर, शिरुर, मावळ याच बरोबर पुणे, पिंपरी चिंचवड, लोणावळा, तळेगाव दाभाडे शहरातून सुगड्यांच्या मागणीची आगाऊ नोंदणी झाली आहे. संपुर्ण कुंभार वाड्यात आत्तापर्यंत दोन लाख सुगडी तयार झाली असून अजून आठवड्याभरात एक लाख सुगडी तयार होतील, असे कारागिरांनी सांगितले.