साफसफाईच्या वेळी शेजारच्यावर पाणी उडाल्याने वाद, रागात गोळीबार अन् एकाचा मृत्यू

देशात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. किरकोळ कारणावरुन वाद विकोपाला पोहचून मोठ्या घटना घडतात, याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. असेच एक प्रकरण बिहारमध्ये घडले आहे. सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरु आहे. मात्र अशातच साफसफाईच्या वादातून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एकाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलीस स्थानाकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण पटणामधील रुपसपूर पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. रविवारी दिवाळीत साफसफाई करताना धनौत येथील रहिवासी शशिभूषण सिन्हा उर्फ ​​कल्लू आणि शेजारी प्रवीण यांच्यात वादाची ठिणगी पेटली. शेजारील व्यक्तीच्या घरातील पाणी दुसऱ्या शेजाऱ्याच्या घरात पडत होते. यावरुन व्यक्तीने याची तक्रार शेजाऱ्याकडे केली. त्यानंतर वाद निर्माण झाला. या वादाला धक्कादायक वळण मिळाले. शेजाऱ्याने पिस्तुल काढत तीन जणांवर गोळीबार केला. त्याने सहा राऊंड फायर केले.

या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. त्यांना पाटणामधील एम्स रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यात एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. गोळीबार झालेले सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. शशिभूषण असे मृताचे नाव आहे. तर नवमी उर्फ ​​झुनकुन आणि विकी उर्फ ​​अमित अशी जखमींची नावे आहेत. घटनेनंतर संतप्त कुटुंबीयांनी आरोपींचे ट्रॅक्टर आणि तीन मोटारसायकली पेटवून दिल्या. यासोबतच आरोपीच्या घराचीही तोडफोड करून जाळपोळ करण्यात आली.

या प्रकरणी रुपसपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी रणविजय कुमार यांनी सांगितले की, दिवाळीच्या दिवशी पाणी सांडण्यावरून दोन शेजाऱ्यांमध्ये वाद झाला होता. यातून गोळीबार करण्यात आला. गोळीबारात तीन जणांना गोळी लागली. उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला तर दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या लोकांनी जाळपोळ सुरू केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.