सचिनला ‘लप्पू, झिंगूर’ म्हटल्याने सीमा हैदर भडकली, शेजारणीला कारवाईची धमकी

सोशल मीडियावर सीमा हैदरची जितकी चर्चा आहे , तितकीच चर्चा सचिनच्या शेजारी राहणाऱ्या मिथिलेश भाटी हिची देखील आहे. पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरवर संताप व्यक्त करताना तिने सचिनला ‘ लप्पू आणि झिंगूर ‘ म्हटले होते. तिचं हे विधान व्हायरल झालं असून रातोरात मिथिलेश भाटीदेखील प्रसिद्ध झाली आहे. मात्र तिने सचिनसाठी मारलेले हे डायलॉग तिला अडचणीत आणू शकतात. सचिनची पाकिस्तानातून आलेली प्रेयसी सीमा हैदर हिने तिच्या वकिलांमार्फत मिथिलेशवर मानहानीचा खटला दाखल करण्याची धमकी दिली आहे. या धमकीमुळे आपण दबंग असल्याचे म्हणणारी मिथिलेश भाटी नरमली असून आपली जीभ घसरल्याचे म्हणत तिने वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल आहे. आपला कोणाचाही अपमान करण्याचा आपला हेतू नव्हता, असे तिने म्हटले आहे.

सीमाला भारतीय नागरिकत्व मिळावे यासाठी मोहीम चालवणारे सुप्रीम कोर्टाचे वकील एपी सिंग यांनी म्हटले की, मिथिलेश भाटी यांनी सचिनबद्दल जे अपमानास्पद उद्गार काढले आहेत, त्याचे उत्तर देशातील प्रत्येक नवरा देईल. एका टीव्ही चॅनलने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मिथिलेश भाटी हिने म्हटले होते की, ‘ क्या है सचिन में , लप्पू सा सचिन है , झिंगूर सा लडका” मिथिलेश यांना सीमा हैदरच्या हेतूवर शंका असून किरकोळ अशा सचिनसाठी ही महिला पाकिस्तानातून इथे का येईल असा प्रश्न त्यांनी विचारला होता. मिथिलेशच्या वाक्यानंतर त्या रातोरात प्रसिद्ध झाल्या, त्यांच्यावर गाणी बनली, मीम बनले आणि इन्फ्लुएन्सर्सनी त्यांच्या संवादावर व्हिडीओ बनवत ते व्हायरल करून टाकले. सीमा हैदर इतकी प्रसिद्धी आता मिथिलेश भाटी यांनाही मिळू लागली असल्याने आता त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सीमा हैदर आणि तिचे वकील सरसावल्याचा आरोप होऊ लागला आहे.

सीमा हैदर यांचे वकील सिंह यांनी म्हटले की भाटी यांनी केलेले विधान, हा देशातील प्रत्येक पतीचा अपमान आहे. कोणत्याही व्यक्तीच्या वर्णावर आणि देहावर अशा पद्धतीची विधाने करणे हे चुकीचे असल्याचं सिंह यांचं म्हणणं आहे. यामुळे मिथिलेश भाटी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करत असल्याचे एपी सिंग यांनी सांगितले. सीमा आणि तिच्या वकिलांनी दिलेल्या धमकीमुळे मिथिलेश यांचा सूर मवाळ झाला असून त्यांनी म्हटले आहे की, मी कोणाचा अपमान केलेला नाही. मला राग आला आणि माझ्या तोंडून ते शब्द बाहेर पडले. अशा गोष्टी सहसा सामान्य भाषेत बोलल्या जातात. लोक मला ‘लप्पी ‘ म्हणतात याचा अर्थ मी लप्पी झाले असा होत नाही असे मिथिलेश यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानातील कराची येथील सीमा हैदर नावाची महिला मे महिन्यात आपल्या चार मुलांसह भारतात आली होती. नेपाळमार्गे बेकायदेशीरपणे देशात घुसलेली सीमा ग्रेटर नोएडामध्ये तिचा प्रियकर सचिन मीणासोबत राहत आहे. सीमा आणि सचिनेची PUBG खेळताना मैत्री झाली होती. जुलैमध्ये ही बातमी पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर दोघांनाही 4 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. 7 जुलै रोजी दोघांनाही काही अटींच्या आधारे जामीन मंजूर करण्यात आला. तेव्हापासून सीमा सचिनच्या घरी राहत असून या दोघांची प्रेमकहाणी देशभरात चर्चेचा विषय झाली आहे.