कोरोनातील शहीद सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश, अधिवेशनावर मोर्चा

कोरोना काळात आपला जीव धोक्यात काम करताना शहीद झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या  कुटुंबीयांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत 50 लाख रुपये सानुग्रह मदत मिळावी, यासह अन्य मागण्यांसाठी भारतीय युवक काँग्रेस आणि अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचा मोर्चा आज विधान भवनावर धडकला. मोर्चात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतमाता, राणी लक्ष्मीबाई यांच्या वेशातील महापुरुषांनी सरकारची चांगलीच कानउघाडणी केली.

विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आपापल्या न्याय्य मागण्यासाठी विविध संघटनांचे मोर्चांनी विधान भवनावर धडक दिली. भारतीय युवक काँग्रेस आणि अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस काढण्यात आलेल्या मोर्चात लाड समितीच्या शिफारसीनुसार अनुपंपा तत्त्वावर 30 दिवसांत नोकरी मिळावी, ऐवजदार कामगारांसाठी 20 वर्षांची अट रद्द करा, 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना जुनी पेन्शन योजना लागू करा, सर्व ऐवजदार कामगारांना नियमित करा, शासन निर्णयाअंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांना घर द्यावे, कोरोना काळात शहीद सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदऱ्यांना अनुपंपा तत्त्वावर नोकरी द्या, नगर परिषदेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्वरीत आर्थिक लाभ द्या, किमान वेतन कायद्यानुसार वेतन बँकेद्वारे करण्यात यावे इत्यादी मागण्या करण्यात आल्या. भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस बंटी शेळके, गोविंद परमार, विकी बढेल, स्वप्नील ढोके यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला.

समग्र कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा

समग्र कर्मचारी महत्त्वपूर्ण काम करीत असल्यामुळे त्यांना सेवेत कायम करावे, या मागणीसाठी समग्र शिक्षा करार कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष संजय अकोले यांच्या नेतृत्वात विधान भवनावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात नरेंद्र नाखले, रवींद्र डहाके, नितीन लसकरी, पुरुषोत्तम ठाकूर उमेश धोटे, शत्रुघ्न चव्हाण यांच्यासह अनेक समग्र कर्मचारी सहभागी झाले होते. ‘समग्र शिक्षा’अंतर्गत 2005-06 पासून करार तत्त्वावर 5 हजार 800 पेक्षा अधिक कर्मचारी विविध संवर्गात कार्यरत आहेत, परंतु 18 ते 20 वर्षांपासून त्यांना तुटपुंजे मानधन देण्यात येते. यासह रिक्त पदांचाही अतिरिक्त कामाचा भारही करार कर्मचाऱ्यांवर असतो. समग्र कर्मचाऱ्यांना सरकारने नियमित केले नाही व कोणत्याही सेवासुविधांचा लाभ दिला जात नाही, यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

विनाअनुदानित दिव्यांग शाळांना सरसकट अनुदान द्या

अनुदानाअभावी दिव्यांगांच्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर असून विनाअनुदानित दिव्यांगांच्या शाळांना सरसकट अनुदान द्या, या मागणीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंचच्या वतीने यशवंत स्टेडियम येथून चिल्लर पैसे उधळत विधान भवनावर मोर्चा धडकला. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जितेंद्र ओव्हाळ यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चमध्ये मुरलीधर गोडबोले, विनोद अडगडे, बाबा बालपांडे, अरुण मनगडे, नंदकुमार गाडे आणि दिव्यांग शाळेत कार्यरत कर्मचारी सहभागी झाले होते. शिष्टमंडळाने समाजकल्याण मंत्रालयाला मागणीचे निवेदन दिल्यानंतर मागण्यासंदर्भात सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला देण्यात आले.

वाढवण बंदर रद्द करा

पालघर जिह्यातील वाढवण बंदर रद्द  करा,  अशी मागणी करत आमदार विनोद निकोले यांनी विधान भवनाच्या  पायऱ्यांवर फलक झळकावून आंदोलन केले. पालघर- डहाणूतील जनतेला उद्ध्वस्त करणाऱ्या विनाशकारी वाढवण बंदर रद्द करा, अशी मागणी त्यांनी केली. हे बंदर जे फक्त दोन चार मोठमोठय़ा उद्योगपतींच्या हितासाठी आणले जाते आहे. या बंदरामुळे पालघरपासून गुजरात सीमेलगत असलेल्या उमरगावपर्यंतचे मच्छीमार उद्ध्वस्त होणार आहे. जिह्यातील शेतकरी, चिकू बागायतदारदेखील उद्ध्वस्त होणार असल्याचे निकोले म्हणाले.