पुण्यातील बुधवार पेठेत 7 बांगलादेशी घुसखोरांना पकडले, सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई

पुणे शहरात बेकायदा वास्तव्य करणार्‍या 7 बांगलादेशी नागरिकांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पकडले. बुधवार पेठेत मंगळवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. कारवाईत 5 महिला, दोन पुरूषांसह एका अल्पवयीन मुलीला ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवार पेठ भागातील वेश्यावस्तीत कुटंणखाण्यात बांगलादेशी महिला बेकायदा वास्तव्य करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. बागंलादेशी महिलांबरोबर त्यांचे निकटवर्तीय देखील वास्तव्य करीत होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने मंगळवारी रात्री बुधवार पेठ भागात छापा टाकला. येथून 5 महिला, दोन पुरूष व एका अल्पवयीन बांगलादेशी मुलीला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण व पारपत्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहायक पोलीस निरीक्षक आश्विनी पाटील, अनिकेत पोटे, राजेश माळेगावे, अंमलदार सागर केकाण, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, तुषार भिवरकर, मनिषा पुकाळे, अमेय रसाळ, इम्रान नदाफ, अमित जमदाडे, रेश्मा कंक, संदीप कोळगे यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.