Pune crime news – लोहारेने कारागृहात ललितला दिला मेफेड्रोनचा फॉर्म्युला

ड्रग्ज तस्कर ललित पाटील याचा साथीदार, तसेच या टोळीचा प्रमुख अरविंद लोहारे याने येरवडा कारागृहात ललितला मेफेड्रोन तयार करण्याचा फॉर्म्युला दिला. ड्रग्जचे उत्पादन, विक्रीचे स्वरूप पाहता या प्रकरणात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन असण्याची शक्यता असून, ड्रग्ज विक्रीतून आलेल्या पैशातून ललितने सोने घेतल्याचे पुणे पोलीसांनी मंगळवारी न्यायालयाला सांगितले.

ड्रग्ज तस्कर ललित पाटील, रोहन चौधरी, शिवाजी शिंदे यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी गुह्याच्या सखोल तपासासाठी त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी, सरकारी वकील विजय फरगडे यांनी केली. सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने तिघांच्या पोलीस कोठीडत  13 नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्याचा आदेश दिला.

टोळीप्रमुख लोहरे याच्यासह तीन आरोपींना या गुह्यात ताब्यात घ्यायचे आहे. हे तिघे सध्या मुंबई पोलीसांच्या ताब्यात आहेत. त्यांचा ताबा घेऊन यापुर्वी अटक केलेले 11 जण आणि हे तिघे असे 14 जणांकडे एकत्रित तपास करायचा आहे असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.