पुणे – फिनिक्स मॉलच्या सातव्या मजल्यावरुन पडून तरुणाचा मृत्यू

विमाननगर येथील फिनिक्स मॉलच्या इमारतीतील सातव्या मजल्यावरुन पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेला तरुण खासगी वित्तीय संस्थेत कामाला होता.

रिचर्ड एबल झकेरिया (वय – 25, रा. फुलेनगर, येरवडा) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी फिनिक्स मॉलच्या वाहनतळाच्या आवरात सातव्या मजल्यावरुन पडून एक तरुण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला कळविण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

रिचर्ड विमाननगर भागातील एका खासगी वित्तीय संस्थेत कामाला होता. तो सातव्या मजल्यावरुन नेमका कसा पडला, याबाबतची माहिती मिळाली नाही. रिचर्डच्या मागे आई-वडील असा परिवार आहे. विमानतळ पोलीस पुढील तपास करत आहेत.