पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांचे प्रमुख, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची आयुक्तालयात परेड

पुण्यातील टॉप मोस्ट गुन्हेगारी टोळ्यांचे प्रमुख, त्यांचे पंटर आणि इतर उदयोन्मुख गुन्हेगारांची पुणे पोलीस आयुक्तालयात हजेरी परेड घेण्यात आली. यावेळी जवळपास ३२ टोळ्यंतील 267 गुन्हेगार उपस्थित होते. पोलिसांनी त्यांना तंबी दिली.

राजकीय आश्रयासाठी गुन्हेगार राजकारणी लोकांच्या गाठी भेटी घेत आहेत. दोन दिवसांपूर्वी पुण्यातील सराईत हेमंत दाभेकर याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव, खासदार श्रीकांत शिंदे यांची वर्ष निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी घायवळ टोळीचा प्रमुख निलेश घायवळ याने थेट मुख्यमंत्री यांची भेट घेतल्याचे समोर आले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी हे दोन्ही फोटो ट्विट केल्याने एकच खळबळ उडाली. या सर्व पार्श्वभूमीवर मंगळवारी पुणे पोलीस आयुक्तालयात पुण्यातील टॉप मोस्ट गुन्हेगार, गुन्हेगारी टोळ्यांचे प्रमुख यांची हजेरी परेड घेण्यात आली.

यामध्ये निलेश घायवळ, गजानन मारणे, सचिन पोटे, बाबा बोडके, उमेश चव्हाण हे टोळीप्रमुख उपस्थित होते. याशिवाय अंदेकर, बंटी पवार, ठोंबरे टोळीसह इतर सराईत उपस्थित होते. हे गुन्हेगार सध्या काय करतात, त्यांचे जमीनदार, मित्र यांची पोलिसांनी माहिती घेतली. तसेच, गुन्हेगारी कृत्यात सहभागी न होण्याबाबत सूचना केल्या. गुन्हेगारी स्वरूपाचे व्हिडिओ रिल्स बनविल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिला. यावेळी सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, सुनील तांबे आदी उपस्थित होते.