विचारा तर खरं…

>> उदय पिंगळे, अर्थ अभ्यासक

वाचकहो, आर्थिक गुंतवणुकीसह आर्थिक समस्यांसंदर्भातील तुमच्या मनातील प्रश्न, शंका [email protected] या ई-मेल आयडीवर पाठवा.

प्रश्न 1 – इंडेक्स फंड म्हणजे काय? – स्वरूप प्रभुणे, खारघर, नवी मुंबई

उत्तर – म्युच्युअल फंड योजनांचा मालमत्ता गुंतवणूक करण्याचा इंडेक्स फंड एक प्रकार आहे. यासाठी इंडेक्स म्हणजे काय याची माहिती असणे गरजेचे आहे. आपण एखादी दिशा दाखवण्यासाठी हाताचे जे बोट दाखवतो त्याला इंग्रजीत ‘इंडेक्स फिंगर’ म्हणतात. त्याप्रमाणे बाजार कोणत्या दिशेला चालला आहे याचा आपण अंदाज बांधू शकतो त्यास ‘बाजार निर्देशांक’ असे म्हणतात.

सध्या सेन्सेक्स आणि निफ्टी हे शेअर बाजाराशी संबंधित निर्देशांक प्रसिद्ध आहेत. बाजारात नोंदलेल्या काही कंपन्यांचे व्यवहार कवडीमोल दराने होतात, तर काही कंपन्यांचे व्यवहार त्यांच्या दर्शनी मूल्याच्या अनेक पटीने होतात. या कंपन्या विविध क्षेत्रांत असून त्यांचे भागभांडवल कमी-अधिक, उलाढाल, नफा यामध्ये फरक आहे अशा असमान परिस्थितीत सर्व कंपन्यांची तुलना करून काही ठोस निष्कर्ष काढणे हे अत्यंत अवघड आहे. यावर उपाय म्हणून शेअर बाजारातील साधारण महत्त्वाच्या सर्व क्षेत्रांचा समतोल साधून त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱया कंपन्यांचे निर्देशांक काढले आहेत. यात समावेश असलेल्या सर्व कंपन्यांच्या सर्व शेअरचे प्रचलित बाजारमूल्य आणि खरेदी-विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सर्व शेअर्सचे फ्री फ्लोट फॅक्टर काढून त्याला बाजारमूल्याने गुणून फ्री फ्लॉट मार्केट कॅपिटलायझेशन काढले जाते. अशा प्रकारे निर्देशांकात समाविष्ट सर्व कंपन्यांच्या फ्री फ्लॉट मार्केट कॅपिटलायझेशनची बेरीज करून तो निर्माण केलेल्या दिवसाच्या निर्देशांकाशी तुलना केले जाते. थोडक्यात इंडेक्स हे एका विशिष्ट दिवसाच्या तुलनेतील एकत्रित मूल्य आहे. यातील प्रत्येक शेअर्सचे त्या निर्देशांकात असलेले भारमूल्य बदलत जाते. सेन्सेक्स आणि निफ्टीतील प्रातिनिधिक शेअर्सवरून, निवडक शेअरवरून, विशिष्ट व्यवसायाचे उत्पादन आणि सेवा- जसे ऑटो, पॉवर, बँकिंग, मेटल, फार्मा इत्यादी त्याचप्रमाणे विविध मालमत्ता प्रकारांवरूनही निर्देशांक बनवले गेले असून ते गुंतवणूकदारांना दिशादर्शनाचे काम करीत आहेत.

प्रश्न 2. तरलता (लिक्विडिटी) म्हणजे काय? – सतीश सराफ, रिस खालापूर

उत्तर – मालमत्तेची खरेदी/विक्री करताना त्याच्या खऱयाखुऱया किमतीवर प्रभाव न पाडता किती सहजतेने त्याचे चलनात रूपांतरित होऊ शकते त्यास त्याची तरलता म्हणतात. तरलता म्हणजे मालमत्तेची प्रचलित चलन निर्माण करण्याची क्षमता. चलन अथवा रोख रक्कम हे तरल मालमत्तेचे उदाहरण. पैशांचा सहजपणे कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेत बदलून घेण्यासाठी उपयोग होऊ शकतो. समभाग, रोखे, युनिट, सोने यांच्या तुलनेत स्थावर मालमत्ता, दुर्मीळ वस्तू, कलात्मक वस्तूंचा संग्रह या मालमत्ता कमी तरल आहेत. तरलता म्हणजे अस्थिरता नव्हे, बाजारात होणाऱया व्यवहारांची संख्या, कार्यकाल, यामुळे तरलतेवर प्रभाव पडू शकतो.