तंत्रशास्त्र विद्यापीठांच्या प्रश्नपत्रिका आता मराठीतही

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील संलग्नित सर्व कॉलेजांतील पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिका यापुढे मराठी भाषेत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रश्नपत्रिकेसह या विद्यापीठातील संलग्नित सर्व कॉलेजांमध्ये आता प्रवेश, शिक्षण, अध्ययन आणि अध्यापनासाठी इंग्रजीसोबत मराठीचा वापर केला जाणार आहे. याबाबतचे विधेयक आज विधानसभेत मंजूर करण्यात आले. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ विधेयक 2024 विधानसभेत मांडले. या विधेयकाला विधानसभेत मंजुरी देण्यात आली असून या विधेयकानुसार या विद्यापीठाची विभागीय कार्यालये राज्यभर असावीत यासाठी सहा विभागीय कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. ही सर्व कार्यालये संबंधित विद्यापीठांच्या पॅम्पसमध्येच असावीत यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली. यासंदर्भातील मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश टोपे यांनी केली होती.