अभिप्राय -शिक्षण क्षेत्रासमोरील आव्हानांची चर्चा

>> राहुल गोखले

शिक्षण या विषयावर संदीप वाकचौरे सातत्याने लिहीत असतात. त्यांच्या याच विषयावरील लेखांचे संकलन म्हणजे ‘पाटी पेन्सिल’ हे पुस्तक. नावावरून प्रतीत होते त्याप्रमाणे कोणत्याही व्यक्तीची जडणघडण ज्या प्राथमिक शाळेच्या शिक्षणात होते त्याच्याशी निगडित काही लेख प्रस्तुत पुस्तकात आहेतच. शिवाय एकूणच शिक्षणाचे प्रयोजन, हिंदुस्थानात त्या क्षेत्राची सद्यस्थिती, त्यासमोरील आव्हाने यांचीही चर्चा लेखकाने केली आहे. पुस्तकात 35 लेख आहेत आणि ते वेळोवेळी लिहिलेले असले तरी ते प्रासंगिकतेच्या मर्यादेत अडकणारे नाहीत.

पुस्तकातील पहिल्याच ‘पाटी पेन्सिल’ या लेखात लेखकाने कोरोना काळात आपल्या पाल्याची शाळेची फी भरण्यात अनेक पालकांना आलेल्या अडचणी, त्यावेळी काही शाळांच्या प्रशासनाचा पिळवणूक करण्याचा आक्षेपार्ह व्यवहार इत्यादींचा परामर्श घेतला आहे. त्यानिमित्ताने लेखकाने फी ठरविण्याचा हक्क पालक संघाला असल्याचे नमूद केले आहे. या सगळय़ाचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या आत्मसन्मानावर होता कामा नये अशी अपेक्षा लेखकाने व्यक्त केली आहे. तोच धागा पकडून पुढील लेखांत लेखकाने कुपोषण-दारिद्रय़ यांमुळे शिक्षण अर्ध्यावर सोडण्याची येणारी वेळ, ते होऊ नये म्हणूनच शालेय पोषण आहार योजनेची निकड, आदर्श शाळा म्हणजे केवळ भौतिक सुविधा नव्हेत तर शैक्षणिक गुणवत्तेची आवश्यकता, शिक्षणाने माणसात माणूसपण पेरले जाण्याची गरज इत्यादी विषयांवर प्रतिपादन केले आहे. शालांत परीक्षेत अनेक शाळांचे निकाल शंभर टक्के लागतात. मात्र त्यात शिक्षकांनी दाखविलेल्या प्रयोगशीलतेचा भाग किती आणि केवळ अंतर्गत मूल्यमापनात गुणांची केलेली उधळण कारणीभूत किती याकडे लेखकाने लक्ष वेधले आहे व ही ‘सूज’ असल्याचा इशारा दिला आहे. यातूनच शिक्षणाचे प्रयोजन काय यावर काही लाखांत लेखकाने मत मांडले आहे.

केवळ साक्षरता हे शिक्षणाचे प्रयोजन नाही तर नैतिकतेचे, स्वावलंबनाचे, माणूसपणाचे मूल्य रुजविणे हे शिक्षणाचे प्रयोजन असल्याचे लेखकाने म्हटले आहे. लेखक म्हणतो, साक्षरतेसाठी आग्रही असणारी आपली व्यवस्था आजच मूल्यांचा विचार करू शकली नाही तर देश म्हणून आपण कधी उभे राहणार? एकशिक्षकी शाळा, शासकीय शाळांमधील पट वाढतानाच महागडय़ा खासगी शिकवण्यांचे वाढते प्रमाण, अनेक शाळांत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसणे, मुलींसाठी शाळांमध्ये स्वच्छतागृहांचा अभाव, राज्यात शालेय स्तरावर सात लाख विद्यार्थी शाळाबाह्य होणे इत्यादी चिंतेच्या बाबी लेखकाने विस्ताराने विशद केल्या आहेत. हे सगळे चित्र पाहिले की शिक्षण क्षेत्राचा खेळखंडोबा झाला आहे का? असा प्रश्न पडल्यावाचून राहणार नाही.

मात्र लेखक केवळ समस्यांचे कथन करून थांबलेला नाही. त्यांनी त्यावर काही उपायही सुचविले आहेत. यात शिक्षण संस्था, शिक्षक या सर्व घटकांच्या मूल्यमापनाची गरज लेखकाने प्रतिपादन केली आहे. छोटय़ा गटातील मुलांत गोष्टींतून मूल्ये रुजविणे, पाठय़पुस्तकांचा कल्पक उपयोग करणे, त्यातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देणे इत्यादी पर्यायांचा उल्लेख करतानाच या सगळय़ा प्रािढयेत शिक्षक या घटकावर सर्वांत मोठी जबाबदारी आहे याचेही स्मरण लेखक करून देतो.

पाटी पेन्सिल
लेखक: संदीप वाकचौरे
प्रकाशक : चपराक प्रकाशन
पृष्ठे : 152 मूल्य : 250/- रुपये