मराठा समाजाच्या रास्ता रोकोस उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी अधिसुचनेमधील सगेसोयरे याचा अद्यादेश शासनाने काढावा व त्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी शनिवारी लातूर शहरात करण्यात आलेल्या रास्ता रोकोस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रास्ता रोको झाला. आंदोलना दरम्यान आंदोलन मार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.

गरुड चौक व पीव्हीआर (5नंबर) चौकात सकाळी 11 ते 1 या कालावधीत हा रास्ता रोको करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर आपल्या गाड्या , दुचाक्या तसेच अन्य वाहने आडवी लावून रस्त्यावरच बैठक दिली होती. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच सरकारविरोधात आंदोलकांनी प्रचंड घोषणाबाजी केली. सरकार तसेच मराठा समाजाच्या लोकप्रतिनिधींचा निषेध करीत एक मराठा लाख मराठा , करेंगे या मरेंगे हम सब जरांगे, आरक्षण आमच्या हक्काच अशा घोषणा दिल्या. कडक ऊन असतानाही आंदोलक आदोलन स्थळावरुन हटले नाहीत. दरम्यान आंदोलन मार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. परीक्षार्थी विद्यार्थी व रुग्णवाहिकांना सोडले जात होते. मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी अधिसुचनेमधील सगेसोयरे याचा अद्यादेश शासनाने त्वरीत काढावा व त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी , हैद्राबाद गॅझेट मधील उल्लेखाप्रमाणे मराठवाड्यातील सर्व मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. ज्याच्या कुणबी म्हणून नोंदी सापडल्या आहेत त्यांनाही सुलभ पध्दतीने प्रमाणपत्र द्यावे ,ओबीसीतुनच आरक्षण दिले जावे, अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या. मनोज जरांगे पाटील जे सांगतील त्याप्रमाणे आंदोलनाची दिशा राहील असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. राष्ट्रगिताने आंदोलनाचा समारोप करण्यात आला. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.