ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरण; पुणे पोलिसांविरुद्ध उद्या धंगेकरांचा ठिय्या

ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरणाचा तपास अतिशय संथ गतीने सुरू आहे. या प्रकरणातील दोषी पोलीस अधिकारी, कारागृह प्रशासन आणि ससून रुग्णालयातील डॉक्टर यांच्यावर कठोर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप कॉँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. ललित पाटील प्रकरणात ठोस कारवाई होत नसल्याने धंगेकर यांनी बुधवार 29 नोव्हेंबरपासून पोलिसांविरुद्ध ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ‘

ड्रग्जमुळे तरुणांचे आयुष्य बरबाद होत असल्याने ड्रग्जमाफियांना तर फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार जाहीरपणे घेतात. पण, दुसरीकडे सर्व पुरावे हातात असताना आणि राज्य सरकारची चौकशी पूर्ण झाल्यावरही ललित पाटील प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे. ललित पाटील प्रकरणामुळे पुणे शहराची सर्वत्र बदनामी होत आहे. अशा प्रकरणांकडे दुर्लक्ष केल्यास पुण्याची ‘उडता पंजाब’ अशी ओळख होण्यास वेळ लागणार नाही. राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाने या विषयाकडे अधिक गंभीरतेने लक्ष देऊन ठोस कारवाई करावी, यासाठी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे रविंद्र धंगेकर यांनी सांगितले.

ससून रुग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकुर आणि डॉ. देवकाते यांनी ललित पाटीलला मदत केल्याचं राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालातून निष्पन्न झालं आहे. त्यानंतर डॉ. संजीव ठाकूर यांना केवळ पदमुक्त करून कारवाई करण्याचा फार्स करण्यात आला. त्यांच्यावर अटकेची कारवाई झालेली नाही. या प्रकरणात ससून रुग्णालयातील क्लार्क महेंद्र शेवतेला अटक झाल्यास त्याच्या चौकशीतून अनेक गोष्टींचा उलगडा होईल, असे धंगेकर म्हणाले.

हिवाळी अधिवेशनात मुद्दा मांडणार

ललिल पाटील ड्रग्स प्रकरणाबाबत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विषय मांडणार आहे. मात्र, मला या प्रकरणाबाबत विधिमंडळात किती बोलू देतील याबाबत शंका आहे. या प्रकरणात सरकार आणि पोलीस प्रशासनाचा हलगर्जीपणा पुढे येत आहे. त्यामुळे हा तपास पेंद्रीय तपास यंत्रणेकडे दिला गेला पाहिजे, असे आमदार धंगेकर म्हणाले.

पोलिसांकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न

या प्रकरणात अनेक बडय़ा पोलिस अधिकाऱयांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये सहभागी ससून आणि कारागृहातील अधिकारी कर्मचारी यांना हात लावण्याची हिंमत पोलिसांनी दाखविलेली नाही. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली तरच यामध्ये दोषी असलेले खरे चेहरे समोर येतील. हे चेहरे समोर आल्यास अनेकांची अडचण होणार असल्याने या प्रकरणावर पडदा टाकण्याची भूमिका पोलिसांकडून घेतली जात आहे, असा गंभीर आरोप रविंद्र धंगेकर यांनी केला.

फडणवीसांकडून दुर्लक्ष

ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दुर्लक्ष होत आहे. त्यांनी लक्ष घातले असते आणि पोलिसांनी वेळेवर कारवाई केली असती आमच्यावर आंदोलन करण्याची वेळ आली नसती. ललित पाटील हा उघड उघड ससूनमध्ये बसून ड्रग्जचा धंदा करत होता. यासाठी त्याने कोटय़वधी रुपयांची लाच पोलीस आणि ससूनच्या डॉक्टरांना दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात कारवाईस टाळाटाळ होत असल्याचे ते म्हणाले.