बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला गती मिळणार; म्हाडाच्या अर्थसंकल्पात सुमारे 3 हजार कोटींची तरतूद

>>मंगेश दराडे 

बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी म्हाडाने पंबर कसली आहे. म्हाडाच्या 2024-2025च्या अर्थसंकल्पात बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी सुमारे 3 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे वरळी, नायगाव आणि ना.म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या कामाला आता आणखी गती मिळणार आहे. गतवर्षी बीडीडी पुनर्विकासासाठी अर्थसंकल्पात 2285 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प सुमारे 92 एकर जागेवर उभारण्यात येत आहे. राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या या प्रकल्पाचे काम महाविकास आघाडीच्या काळात सुरू झाले आहे. पुनर्विकासामुळे वर्षानुवर्षे 160 चौरस फुटाच्या घरात राहणाऱया रहिवाशांना 500 फुटाचे प्रशस्त घर विनामूल्य मिळणार असून  व्हिट्रीफाईड टाईल्सचे फ्लोरिंग, किचन आणि टॉयलेटमध्ये ऑण्टिस्किड टाईल्स, सिंकसहित ग्रॅनाईट किचन ओटा, खिडक्यांना अॅनोडाईड सेक्शन, टॉयलेटसाठी मार्बलची फ्रेम असलेले दरवाजे अशा उच्च दर्जाच्या सोईसुविधा रहिवाशांना मिळणार आहेत. या प्रकल्पाचा पहिला टप्पा 2026पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश म्हाडा उपाध्यक्षांनी यापूर्वीच दिले आहेत.

संक्रमण शिबिरासाठी शिवशाहीची 700 घरे  

बीडीडी चाळींच्या जागेवर टोलेजंग इमारती उभारल्या जात असून त्यासाठी चाळी टप्प्याटप्प्याने रिकाम्या केल्या जात आहेत. संबंधित रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित केले जाते किंवा ज्यांना संक्रमण शिबिरात घर नको आहे अशांना दरमहा 25 हजार रुपये भाडे देण्यात येते. शिवशाही
प्रकल्पा अंतर्गत 700 घरे संक्रमण शिबिरासाठी घेण्याची म्हाडाची योजना आहे. बीडीडीतील ज्या रहिवाशांना संक्रमण शिबिरात घर हवे आहे अशा रहिवाशांना ही घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

अशी आहे प्रकल्पाची सद्यस्थिती

n वरळीतील 121 चाळींचा पुनर्विकास करून 9689 सदनिका उभारण्यात येणार आहेत. पुनर्वसन इमारत क्रमांक 1 मधील
8 विंगचे काम प्रगतीपथावर आहे. यापैकी डी आणि ई विंगचे
40 मजले पूर्ण झाले आहेत. सहा विंगचे संरचनात्मक काम विविध मजल्यांपर्यंत पोहोचले आहे. येथील रहिवाशांना प्रत्येक फ्लॅटसोबत पार्ंकगदेखील मिळणार आहे. यासंदर्भातला प्रस्ताव म्हाडाने राज्य सरकारकडे पाठवला आहे.

n ना.म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पा अंतर्गत 2560 पुनर्वसन सदनिकांची निर्मिती करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यांतर्गत एकूण 7 विंगपैकी 2 विंग तळमजल्यापर्यंत आल्या आहेत.

n नायगाव बीडीडी चाळींचा पुनर्विकास दोन टप्प्यांत केला जाणार असून 2344 पुनर्वसन सदनिकांचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात 23 चाळींचा तर दुसऱया टप्प्यात 19 चाळींचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील आठपैकी 5 पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू आहे.