सामना अग्रलेख – आता म्यानमारही घुसले

देशाच्या एकूणच सीमांचा विचार केला तर चीनकडून सातत्याने हिंदुस्थानात घुसखोरी सुरू आहे. 13 हॉटस्पॉटवरून चीन टप्प्याटप्प्याने व पुनः पुन्हा घुसखोरी करतो. पाकिस्तानातून जम्मू-कश्मीरात होणारी दहशतवाद्यांची घुसखोरीही थांबलेली नाही आणि त्यात आता म्यानमारच्या घुसखोरीने हिंदुस्थानची चिंता वाढवली आहे. देशाच्या सीमेवर अशी चिंताजनक परिस्थिती असताना ‘मै चौकीदार हूँ’ असे छातीठोकपणे सांगणारे पंतप्रधान मात्र पर्यटन व ‘रोड शो’ करीत फिरत आहेत. रामरायानेच आता या चौकीदाराला सद्बुद्धी द्यावी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपमध्ये एखाद्या मॉडेलप्रमाणे केलेले फोटोसेशन अथवा त्यांचे सर्वत्र होत असलेले ‘रोड शो’ वगैरे पाहून देशासमोर आता एकही समस्या उरलेली नाही आणि देशाच्या सीमा, तेथील सुरक्षा वगैरे सारे काही आलबेल आहे, असा देशवासीयांचा गैरसमज होऊ शकतो. तथापि, हे सत्य नाही. 4 हजार स्क्वेअर किलोमीटरचा लडाखलगत असलेला हिंदुस्थानचा महाकाय भूभाग बळकावल्यानंतरही चीनची हिंदुस्थानात घुसखोरी सुरूच आहे. पाकिस्तानातून जम्मू-कश्मीरात होणारी घुसखोरीही थांबलेली नाही आणि आता तर म्यानमारसारख्या चिटुकल्या देशानेही हिंदुस्थानात घुसखोरी केल्याची माहिती पुढे आली आहे. थोडेथोडके नव्हे, तर म्यानमारचे तब्बल 416 सैनिक कुठल्याही परवानगीशिवाय हिंदुस्थानी हद्दीत घुसले. या सर्व सैनिकांना आता म्यानमारमध्ये परत पाठवण्यात आले असले तरी म्यानमारसारख्या लिंबू-टिंबू देशाच्या सैनिकांनी हिंदुस्थानची सीमा ओलांडून घुसखोरी करावी, ही बाब ना स्वतःला ‘चौकीदार’ म्हणवणाऱ्या पंतप्रधानांसाठी भूषणावह आहे ना देशासाठी! खुद्द हिंदुस्थानचे लष्करप्रमुख मनोज पांडे यांनीच हिंदुस्थान-म्यानमार सीमेजवळील तीन ठिकाणची परिस्थिती चिंताजनक असल्याचे नमूद केले आहे. म्यानमारचे सैनिक हिंदुस्थानच्या हद्दीत घुसले हे खरे असले तरी आपले लष्कर सज्ज आहे, असे

लष्करप्रमुखांनी

सांगितले. सुमारे तीन वर्षांपूर्वी म्यानमारमधील आँग सान स्यू-की यांचे लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार लष्कराने उलथवून लावल्यापासून म्यानमारमध्ये यादवी युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. म्यानमारच्या अनेक संघटनांनी शस्त्रे हाती घेऊन हुकूमशाहीचा वरवंटा फिरवणाऱया म्यानमारच्या लष्करी राजवटीशी सशस्त्र संघर्ष पुकारला आहे. आपल्याच देशाच्या या बंडखोरांवर म्यानमारचे लष्करी सरकार दोन वर्षांपासून हवाई हल्ले करीत आहे. दोन दिवसांपूर्वी हिंदुस्थानच्या अगदी सीमारेषेलगत असलेल्या सासांग प्रांतातील खमपत शहरात म्यानमारच्या सैनिकांनी मोठा हवाई हल्ला केला. लढाऊ विमानांनी कानन गावात तीन बॉम्ब टाकले. यात गावातील शाळा व आजूबाजूच्या इमारतींमध्ये राहणाऱया 17 नागरिकांचा मृत्यू झाला. शाळेजवळील 10 घरे या बॉम्बहल्ल्यात उद्ध्वस्त झाली. हे सगळे हिंदुस्थानच्या सीमेजवळ घडले. म्यानमारच्या सरकारने या हवाई हल्ल्याचा इन्कार केला असला तरी स्थानिक रहिवाशांनी लष्करी राजवटीच्या दबावाला न जुमानता या हल्ल्यांचे सत्य जागतिक मीडियाला सांगितले. या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानचे लष्करप्रमुख मनोज पांडे यांनी शुक्रवारी पत्रकारांना जी माहिती दिली, ती खरोखरच चिंता वाढवणारी आहे. म्यानमारमधील काही बंडखोर गट तेथील सीमावर्ती भागांत मोठय़ा दबावाखाली आहेत व

हे बंडखोर

म्यानमारच्या सैनिकांपासून बचावण्यासाठी मणिपूरमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आधीच मणिपूर हे आपले ईशान्येकडील राज्य वांशिक संघर्षामुळे गेले अनेक महिने जळत आहे. वांशिक विद्वेशातून तेथे उसळलेला भयंकर हिंसाचार, अमानुष हत्याकांडे, महिलांवर करण्यात आलेले राक्षसी अत्याचार अशा घटनांमुळे मणिपूर हा देशातील सर्वात अशांत टापू बनला असतानाच म्यानमारमधील सशस्त्र बंडखोर जर मणिपूरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असतील तर ते नक्कीच गंभीर आहे. लष्करप्रमुख पांडे यांनी ‘चिंताजनक’ हा शब्द त्यासाठीच व जबाबदारीने वापरला असावा. लष्कर दिनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत लष्करप्रमुख मनोज पांडे यांनी हिंदुस्थान-चीनच्या सीमेवरील खास करून लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थिती संवेदनशील असल्याचे सांगितले. देशाच्या एकूणच सीमांचा विचार केला तर चीनकडून सातत्याने हिंदुस्थानात घुसखोरी सुरू आहे.

13 हॉटस्पॉटवरून चीन टप्प्याटप्प्याने व पुनःपुन्हा घुसखोरी करतो. पाकिस्तानातून जम्मू-कश्मीरात होणारी दहशतवाद्यांची घुसखोरीही थांबलेली नाही आणि त्यात आता म्यानमारच्या घुसखोरीने हिंदुस्थानची चिंता वाढवली आहे. देशाच्या सीमेवर अशी चिंताजनक परिस्थिती असताना ‘मै चौकीदार हूँ’ असे छातीठोकपणे सांगणारे पंतप्रधान मात्र पर्यटन व ‘रोड शो’ करीत फिरत आहेत. रामरायानेच आता या चौकीदाराला सद्बुद्धी द्यावी!