सामना अग्रलेख – संसदेचे स्मशान झाले

केंद्र सरकारने लोकसभेचीमूकसभाकरून विचित्र परिस्थितीत देशाला ढकलले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेहरू, सरदार पटेल वगैरेंच्या काळात मोदीशहांचे राज्य असते तर त्यांनी डॉ. आंबेडकर, सरदार पटेलांनाही प्रश्न विचारल्याबद्दल संसदेतून निलंबित केले असते. दोन दिवसांत 143 खासदारांचे निलंबन केले. हे एकप्रकारे मस्तवालपणाचे वैफल्याचे लक्षण आहे. संसदेचे महत्त्व, प्रतिष्ठा, वैभव नष्ट झाले आहे. लोकशाहीचे स्मशान लोकशाहीच्या मंदिरात झाले. श्रीराम मंदिराचे उद्घाटन करून आता काय करणार? संविधानासह सगळेच सरणावर चढले, पण जनता सती जाणार नाही. ती लढत राहील!

पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा यांना लोकशाही, संविधान, व्यक्तिस्वातंत्र्य याबाबत थोडेही प्रेम नाही हे आता स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान बोलतात एक, पण करतात दुसरेच. लोक मूर्ख आहेत व जे मूर्ख नाहीत त्यांना आपण सहज मूर्ख बनवू शकतो असा त्यांचा आत्मविश्वास आहे. मोदी यांनी भाजप संसदीय दलाच्या बैठकीत त्यांच्या खासदारांचे प्रबोधन केले. ‘‘विरोधी पक्ष संसदेतील घुसखोरीचे समर्थन करीत आहेत, ते बरोबर नाही. संसदेतील सेंधमारीचे कोणी समर्थन करू नये.’’ पंतप्रधानांचे हे वक्तव्य म्हणजे राजकीय मिमिक्री आहे. संसदेत घुसखोरी झाली. बेरोजगार तरुणांनी हे कृत्य केले. याचा अर्थ अतिरेक्यांनी जर मनात आणले असते तर ते संसदेत याच पद्धतीने घुसू शकले असते व त्यांनी दहशतवादी कृत्य घडवून हाहाकार माजवला असता. संसदेत घुसखोरी का व कशी झाली? त्यास जबाबदार कोण? असा प्रश्न सभागृहात विरोधकांनी विचारला, हा काय अपराध झाला? गृहमंत्र्यांनी या विषयावर बाहेर प्रवचने झोडण्यापेक्षा संसदेत बोलावे. संसदेचे अधिवेशन सुरू आहे व घुसखोरीबाबत पंतप्रधान, गृहमंत्री बाहेर खुलासे करीत फिरत आहेत. यावर जाब विचारणाऱ्या 143 खासदारांना सरकारने निलंबित केले. पुन्हा विरोधकांवर ठपका ठेवून पंतप्रधान मोदी लोकशाहीची मिमिक्री करीत आहेत. संसदेतील घुसखोरीसंदर्भात एक चार ओळींचे निवेदनच करायचे होते, पण त्याऐवजी लोकसभा, राज्यसभेतून विरोधकांना हाकलून दिले गेले व लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिराचे सरकारने स्मशान करून ठेवले. 22 जानेवारीला पंतप्रधान अयोध्येत जाऊन भव्य श्रीराम मंदिराचे लोकार्पण करीत आहेत, पण त्यांनी

लोकशाही मंदिराचे

हे असे स्मशान करून ठेवले त्याचे काय? राममंदिराचे उद्घाटन करण्याचा अधिकार यांना उरला आहे काय? श्री. मोदी यांचे म्हणणे असे की, ‘‘विधानसभा निवडणुकांत पराभव झाल्यामुळे विपक्ष हताश झाला आहे व संसदेतील घुसखोरी प्रकरणाचे राजकारण करीत आहे.’’ श्री. मोदी यांच्या बोलण्यास अर्थ नाही. विपक्ष हताश वगैरे झालेला नाही. ‘ईव्हीएम है तो मोदी है’ हाच चार राज्यांच्या निकालांचा अर्थ आहे. विपक्ष पराभवामुळे हताश झाला नसून भाजप व त्यांच्या नेत्यांना विजयाची नशा आणि उन्माद चढला आहे. त्या उन्मादात ते संसदेच्या नियम, संविधानास आग लावून त्याचे स्मशान करीत आहेत, पण विरोधी पक्ष त्याही परिस्थितीत लढत आहे व छातीवर घाव झेलून पुढे जात आहे. मोदी हे लोकशाहीचे खरेच भोक्ते असतील तर त्यांनी 2024 च्या निवडणुका मतपत्रिकेवर घेऊन आपल्या विरोधकांचा पराभव करून दाखवावा. या सगळय़ा घडामोडीत पंतप्रधान मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्याशी फोनवर चर्चा केली. इस्रायल-हमास संघर्षावर दोघांत चर्चा झाली. मोदी यांनी नेतान्याहू यांच्याशी तेथील निवडणूक पद्धतीवर चर्चा करायला हवी. ईव्हीएम हॅकिंग, पेगॅसस वगैरे तंत्र इस्रायलकडून भाजपास मिळाले असले तरी खुद्द नेत्यान्याहू यांच्या देशात मतपत्रिकेवर निवडणुका घेतल्या जातात. इस्रायलच्या विरोधी पक्षांना ‘ईव्हीएम’वर भरवसा नाही. जगाने नाकारलेली सर्व तंत्रे भारतात आणून मोदी हे ‘विश्वगुरू’ वगैरे बनायला निघाले आहेत व त्यावर प्रश्न विचारले की त्यांचा संयम तुटतो. संसदेत

विरोधकांना निलंबित

करून श्री. मोदी यांनी अनेक महत्त्वाची विधेयके मंजूर करून घेतली. विरोधक विधेयकांतील फोलपणा चव्हाटय़ावर आणतील ही भीती सरकारला असावी. प्रचंड बहुमत असूनही मोदी व त्यांचे सरकार विरोधकांना इतके का घाबरते? याचे उत्तर त्यांचे बहुमत खरे नाही असे आहे. मोदी यांनी अंधभक्तांच्या फौजा निर्माण केल्या आहेत व हे अंधभक्त भांग प्यायल्याप्रमाणे भक्तीचे तांडव करीत असतात. यातील प्रत्येक जण बेरोजगारीचा स्फोट व त्यातून संसदेत झालेल्या घुसखोरीवर चूप आहे. भक्त अंध आहेत व मुकेही आहेत. केंद्र सरकारने लोकसभेची ‘मूकसभा’ करून विचित्र परिस्थितीत देशाला ढकलले आहे. दोन दिवसांत 143 खासदारांचे निलंबन केले. त्यात अनेक जुने-जाणते संसदपटू आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेहरू, सरदार पटेल वगैरेंच्या काळात मोदी-शहांचे राज्य असते तर त्यांनी डॉ. आंबेडकर, सरदार पटेलांनाही प्रश्न विचारल्याबद्दल संसदेतून निलंबित केले असते. हे एकप्रकारे मस्तवालपणाचे व वैफल्याचे लक्षण आहे. चार राज्यांतील पराभवामुळे ‘इंडिया’ आघाडी जोरात कामास लागली, कारण त्यांना संघर्ष करायचा आहे. मोदी म्हणतात, 2024 साली विरोधकांचा आकडा आज आहे त्यापेक्षा कमी होईल. कारण त्यांचा विश्वास ‘ईव्हीएम’च्या कारनाम्यांवर आहे. 2024 साली विरोधकांचा त्या पद्धतीने पराभव घडवून भाजपास त्यांच्या मित्र उद्योगपतींच्या सभा संसदेत भरवायच्या आहेत काय? त्यांचा मानस तर तोच दिसतो. संसदेचे महत्त्व, प्रतिष्ठा, वैभव नष्ट झाले आहे. लोकशाहीचे स्मशान लोकशाहीच्या मंदिरात झाले. श्रीराम मंदिराचे उद्घाटन करून आता काय करणार? संविधानासह सगळेच सरणावर चढले, पण जनता सती जाणार नाही. ती लढत राहील!